उत्तर प्रदेशात 'यादवी दंगल', काँग्रेस देणार अखिलेश यादव यांना पाठींबा

 सपातून हकालपट्टीतून केल्याला अखिलेश यादव यांना सरकार स्थापनेसाठी  काँग्रेस  पाठींबा देणार आहे. त्यामुळे सरकार वाचणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Updated: Dec 31, 2016, 08:30 AM IST
उत्तर प्रदेशात 'यादवी दंगल', काँग्रेस देणार अखिलेश यादव यांना पाठींबा title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात राजकीय दंगल झाली आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याने अखेर वडिलांनी मुलाला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता राजकीय घडामोडीला वेग आलाय. सपातून हकालपट्टीतून केल्याला अखिलेश यादव यांना सरकार स्थापनेसाठी  काँग्रेस  पाठींबा देणार आहे. त्यामुळे सरकार वाचणार का, याकडे लक्ष लागले आहे.

उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीत उभी फूट पडलीय. शिस्तभंगाची कारवाई करत सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी चक्क आपल्या मुलाची म्हणजेच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीच पक्षातून हकालपट्टी केलीय. सोबतच, सपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभेचे खासदार रामगोपाल यादव यांनाही पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे अखिलेश यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल अथवा बहुमत सिध्द करावे लागणार आहे.

या घडामोडीनंतर काँग्रेसने अखिलेश यांच्यापुढे 'हात' मिळवणी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. उत्तर प्रदेशातील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. काँग्रेस अखिलेशला पाठींबा देणार आहे. बहुमत सिद्ध करताना हा पाठींबा असणार आहे. सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसची अखिलेश याच्याशी जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.

राजकीय वादाची ठिणगी

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उमेदवारांची वेगळी यादी जाहीर केल्यानं नाराज झालेल्या मुलायम सिंग यादव यांनी 'अखिलेश यादव पक्षात गटबाजी करत आहे' असा आरोप करत ही शिस्तभंगाची कारवाई केलीय. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत मुलायम यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचं जाहीर केले. यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणाला वेगळं वळण लागले.

तर त्याआधी शिवपाल यादव यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समर्थकांना डच्चू देण्यात आला होता. तसेच अखिलेश यादव यांचा विरोध असणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे अखिलेश कमालीचे नाराज झाले. त्यांनी आपल्या २३५ उमेदवारांची यादीच जाहीर करत बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे हा वाद टोकाला जाण्याचे संकेत मिळाले आणि झाले तसेच. समाजवादी पक्षात उभी फूट पडली.