www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुनावण्यात आलेली तीन वर्षाची शिक्षा आपल्याला मान्य नसून त्याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं निर्भयाचे कुटुंबिय म्हणाले. शिवाय `त्या`नराधमाला फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणीही त्यांनी केली. जुवेनाईल कोर्टाच्या निकालाबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जुवेनाईल कोर्टानं दोषी ठरवत तीन वर्षाची शिक्षा शनिवारी सुनावली आणि बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी गीतांजली गोयल यांनी ही शिक्षा सुनावली.
`ज्या पद्धतीनं आमच्या मुलीवर सामूहिकरित्या बलात्कार करण्यात आला त्यातील दोषींना खरं तर फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. पण त्याला फक्त तीन वर्षांची बाल सुधारगृहात राहण्याची शिक्षा सुनावल्यानं आम्ही निराश झालो,` असं पीडित तरुणीच्या वडिलांनी सागितलं. कोर्टाच्या या निकालामुळं आणखी अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे वळतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जुवेनाईल कोर्टानं दोषी ठरवलेल्या या अल्पवयीन आरोपीनं नुकतंच अठरावं वर्ष पूर्ण केलंय. १६ डिसेंबर २०१२ला बलात्काराच्या घटनेवेळी त्याचं वय साडेसतरा वर्ष होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.