नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या रायसीना डायलॉग मध्ये परराष्ट्र खात्याचे सचिव एस जयशंकर यांनी दहशतवादाचा जगासाठी धोका असल्याचं म्हटलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या रायसीना डायलॉगमध्ये त्यांनी म्हटलं की, सध्या दहशतवाद संपवण्याचं आव्हान जगासमोर आहे. मानवाच्या सुरक्षेसाठी नाही तर जगाच्या विकासासाठी देखील दहशतवाद संपवणं गरजेचं आहे. 17 जानेवारीपासून सुरु झालेल्या या रायसीना डॉयलॉगमध्ये 65 देशांचे जवळपास 250 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
जयशंकर यांनी पाकिस्तानचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. सार्क एका देशामुळे असुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागील 2 वर्षात भारत आणि रूसमध्ये संबंध अधिक मजबूत झाले आहेत. दोन्ही देश एकमेकांचा सन्मान करतात. रायसीना डायलॉगदरम्यान त्यांनी अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा देखील उल्लेख केला. भविष्यात चांगल्या संबंधांसाठी भारत ट्रंप ट्रांजीशिन टीमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. जयशंकर यांनी म्हटलं की, 2008 पासून आतापर्यंत भारताने तंत्रज्ञान आणि व्यापार यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याचा फायदा देशाच्या विकासात पाहायला मिळाला आहे.