पाटणा : बिहार राज्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावावरुन, मुख्यमंत्री जीतनराम मांझी विरुद्ध जेडीयूचे नितीशकुमार अशी उभी फूट पडली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये संयुक्त जनता दल म्हणजेच जेडीयूला पराभवाचा सामना करावा लागला. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी आपला उत्तराधिकारी म्हणून नितीशकुमार यांनी उपद्रवमुल्य कमी असलेल्या जीतनराम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली.
मात्र एक वर्ष पूर्ण होत नाही तोच, नितीशकुमार आणि जीतनराम मांझी यांच्यातला संघर्ष विकोलापाला गेलाय. बिहार विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव जीतनराम मांझी यांनी कॅबिनेट समोर ठेवला आणि या संघर्षाचा कडेलोट झाला.
दरम्यान कॅबिनेटमधल्या नितीशकुमार समर्थक २२ मंत्र्यांनी विधानसभा बरखास्तीच्या प्रस्तावाला विरोध केला. तर ७ मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला. मात्र बहुमतानं प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतरही राजकीय पेज कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.