नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला. राज्यसभेमध्ये या मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. दरम्यान, लोकसभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरदार झडल्यात.
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित राहून चर्चा ऐकण्याची मागणी केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं सुरूवातीला 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं. दुसरीकडे विरोधी पक्षांनी संसद भवन परिसरात काळा दिवस पाळत निदर्शनं केली.
गांधीजींच्या पुतळ्यासमोर विरोधक एकत्र आले आणि नोटबंदी निर्णयाचा निषेध केला. विरोधकांच्या या आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, जेडीयूचे शरद यादव, सपाचे रामगोपाल यादव, राजद नेता जयप्रकाश नारायण यादव उपस्थित होते. या निमित्तानं दोन्ही बाजूंकडून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.