नवी दिल्ली : राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसनं प्रवास करणं आता भलतच महागात पडणार आहे. या गाड्यांच्या तिकीटांमध्ये 10 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. 9 सप्टेंबर म्हणजेच आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
या गाड्यांमधली पहिल्या 10 टक्के तिकीटांना नेहमीचेच दर असतील. यानंतरच्या पुढच्या प्रत्येक 10 टक्के तिकीटांसाठी दर वाढत जातील. 50 टक्के दरवाढ करण्याची कमाल मर्यादा देण्यात आली आहे.
एसी फर्स्ट क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लासची तिकीट मात्र आधीच्या दरामध्ये मिळणार आहेत. देशभरामध्ये 42 राजधानी एक्स्प्रेस, 46 शताब्दी एक्स्प्रेस आणि 54 दुरान्तो एक्स्प्रेस धावतात. या नव्या तिकीट प्रणालीमुळे रेल्वेला 500 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे.
या नव्या तिकीट प्रणालीनुसार टु टायर एसी आणि चेअर कारसाठी जास्तीत जास्त 50 टक्के आणि 3 टायर एसीसाठी जास्तीत जास्त 40 टक्के दरवाढ असणार आहे. रिजर्वेशन चार्ज, सुपरफास्ट चार्ज, कॅटरिंग चार्ज आणि सर्व्हिस चार्जच्या रकमेमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही.
उदाहरणार्थ नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचं तिकीट 1628 रुपये होतं. नव्या प्रणालीनुसार पहिली 10 टक्के रिजर्वेशन झाल्यानंतर पुढच्या 10 टक्क्यांसाठी जास्तीची 10 टक्के रक्कम म्हणजेच 1791 रुपये द्यावे लागणार आहे. पुढे ही रक्कम 2279 रुपयांपर्यंत म्हणजेच 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.