www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मागील वर्षी जेव्हा दिल्ली गँगरेप प्रकरणानं दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरवून सोडला होता. तेव्हा ख्रिसमसच्या रात्री दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये या वकील तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला.‘जर्नल ऑफ इंडियन लॉ अँड सोसायटी’च्या ब्लॉगमध्ये या वकील तरूणीनं हा भयंकर अनुभव मांडलाय.
सुप्रिम कोर्टाच्या एका न्यायमूर्तींनी विनयभंग केल्याचा आरोप एका वकील तरूणीनं लावला आहे. हे न्यायमूर्ती आता निवृत्त झाले आहेत. वकिलीच्या अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य असलेलं प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या काळात त्या न्यायमूर्तींनी विनयभंग केल्याचा आरोप या तरूणीनं आपल्या ब्लॉगमधून केला आहे.
६ नोव्हेंबर २०१३ रोजी तिनं ‘जर्नल ऑफ इंडियन लॉ अँड सोसायटी’च्या ब्लॉगमध्ये आपला अनुभव मांडला. ही वकील तरूणी कोलकात्याच्या नॅशनल युनिवर्सिटी ऑफ ज्युरीडिकल सायसेन्सची विद्यार्थीनी आहे. वकीलीची सनद घेतल्यानंतर सध्या ती एका स्वंयसेवी संस्थेसोबत काम करत आहे.
दिल्लीतल्या एका हॉटेलमधील रूममध्ये आता निवृत्त झालेल्या आणि एका प्रख्यात तसंच प्रसिद्ध न्यायमूर्तींनी तिचा विनयभंग केल्याचा तिचा आरोप आहे. या आरोपामुळं एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. न्यायमंडळातील भ्रष्टाचाराबाबत यापूर्वीही अनेकदा आरोप झाले आहेत. मात्र न्यायालयांचा अवमान होईल, म्हणून त्याविषयी कुणी उघडपणे बोलत नाही. या तरूणीनं आपल्या ब्लॉगमधून त्या न्यायमूर्तींचं नाव जाहीर केलेलं नाही. एवढंच नाही तर त्या न्यायमूर्तींविरूद्ध कसलीही कारवाई करायची नाही, असंही त्या तरूणीनं आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केलंय.
याच वकील तरूणीनं एका कायदेविषयक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयातील आणखी काही न्यायमूर्ती असाच काही प्रशिक्षणार्थी वकिलांचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती दिली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.