इस्लामाबाद पाकिस्तानच्या नव्या संरक्षण धोरणानुसार पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानातील हवाई हद्दीचा भंग करणाऱ्या अमेरिकन ड्रोण एअरक्राफ्ट पाडू शकतील. पाकिस्तानी सैन्याला नाटोच्या सेनादलांचा मुकाबला करण्यासाठी अधिक मोकळीक देण्यात आली आहे. पाकिस्तानी ह्वाई हद्दीचा भंग करणारे कोणतेही विमान किंवा अमेरिकन ड्रोण हे शत्रूचं आहे असं समजून ते पाडण्यात येईल असं एका वरिष्ठ पाकिस्तानी सेना अधिकाऱ्याने एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.
नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात २४ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड प्रमाणात अमेरिकेविरुध्द उद्रेक निर्माण झाल्यानंतर हे कठोर पाऊल पाकिस्तानने उचललं आहे. पाकचे सेनादल प्रमुख जनरल अशफाक परवेझ कयानी यांनी जारी केलेल्या एका पत्रकानुसार पाक सैन्याला वरिष्ठांशी सल्लामसलत न करता भविष्यातील कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पाकिस्तानने याआधीच अफगाणीस्तानात नाटोच्या फौजांना पाक मार्ग जाणाऱ्या रसदीचे मार्ग बंद केले आहेत तसंच शम्सी हवाई तळ अमेरिकेला खाली करायला लावला आहे.