ब्रिटनमध्ये वर्णद्वेषातून भारतीय तरूणाची हत्या

ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुज बिडवे असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा संशय आहे.

Updated: Dec 28, 2011, 05:41 PM IST

झी २४ तास वेब टीम, लंडन

 

ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुज बिडवे असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा संशय आहे. या धक्कादायक घटना इथेच संपत नाहीत, तर अनुजच्या मृत्यूची बातमी भारतीय दूतावास किंवा ब्रिटीश प्रशासनाकडून  अनुजच्या आईचे अश्रू काही केल्या थांबत नाही. तर त्याचे बाबा अजून या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांचा एकुलता एक मुलगा अनुजचा अवघ्या २३व्या वर्षी नाहक बळी गेला आहे. अनुज तीनच महिन्यांपूर्वी ब्रिटनमधल्या लँकशायर युनिव्हर्सिटीत एम एस करण्यासाठी गेला.

 

त्याच्या काही भारतीय मित्रांबरोबर ख्रिसमस सेलिब्रेशन पार्टीतून परतत होता. त्यावेळी ब्रिटनच्या दोन स्थानिक मद्यधुंद तरुणांनी अनुजला घेरलं आणि त्यातल्या एकानं थेट अर्जुनच्या डोक्यात गोळी घातली.  त्यात अनुजचा जागीच मृत्यू झाला. वर्णद्वेषातून अनुजची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. सोमवारी सकाळी एका मुलीनं अनुजच्या संदर्भात काहीतरी वाईट घडल्याची कमेंट फेसबुकवर टाकली आणि त्यातूनच अनुजच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरच्यांना कळली. सध्या ब्रिटनमध्ये ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टची धूम आहे. त्यामुळे बिडवे कुटुंबीयांवर झालेल्या आघातावर लक्ष द्यायला ब्रिटनमध्ये कुणालाच वेळ नाही. त्याचा मृतदेह ताब्यात मिळायला किती दिवस लागतील, हेही सांगता येत नाही.

 

अनुजचे कुटुंबीय आणि मित्र भारतीय दूतावास आणि ब्रिटीश प्रशासनाच्या संपर्कात आहेत. अनुजच्या मारेकऱ्याचा शोध सुरु असल्याचं ब्रिटन पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे. अनुजची हत्या करणारे सापडतीलही पण बिडवे कुटुंबीयांना त्यांच्या काळजाचा तुकडा परत मिळणार नाही. आता किमान अनुजचा मृतदेह लवकर मिळावा, यासाठी सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ही हत्या वर्णद्वेषातून झाली असल्यास त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे.