www.24taas.com, बर्लिन
जर्मनीत १८९४ साली इन नदीच्या बर्फाने गोठलेल्या पात्रात एका चार वर्षाच्या मुलाला एका फादरने वाचवलं होतं तो अडोल्फ हिटलर असण्याची शक्यता आता इतिहासकारांनी व्यक्त केली आहे. एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार १८९४ सालच्या जानेवारी महिन्यात एका लहान मुलाला नदीतून बुडताना वाचवण्यात आलं होतं आणि त्यासंबंधीचे पुरावे दप्तरात उपलब्ध आहेत. मॅक्स ट्रेम्मेल या फादरने त्याच्या पूर्वसूरी असलेल्या जोहान्न कुएहबर्गरने हिटलरला वाचवलं होतं. फादर ट्रेम्मेल यांनी आपल्या मृत्यूपूर्वी १९८० साली सांगितलं की हिटलरच्या समान वयाच्या एका मुलगा नदीत बुडताना पाहिला आणि त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली.
अर्थात या घटनेची सत्यता हिटलरच्या जीवंतपणी कधीही पडताळून पाहण्यात आली नाही. पण आता डानुबे येथून १८९४ साली प्रकाशीत झालेल्या एका वर्तमानपत्राचे कात्रण सापडलं आहे. या कात्रणात एक लहान मुलगा नदीच्या पात्रात असलेल्या बर्फात पडल्याचा उल्लेख आहे. त्याकाळात हे वर्तमानपत्र डाव्या विचारसरणीशी बांधीलकी मानणारं होतं त्यामुळे बातमीत एक दृढनिश्चियी कॉम्रेडने गोठलेल्या नदी पात्रात उडी मारून त्या लहानग्याला वाचवल्याचं वृत्त त्या कात्रणात आहे. आणि हाच लहानगा भविष्यात अनेकांचा कर्दनकाळ ठरला. एना एलिझाबेथ रॉसमुसने लिहिलेल्या पुस्तकात या घटनाक्रमाचा उल्लेख आहे. त्या पुस्ताकात लेखिकेने लिहिलं आहे की मुलांचा एक चमु खेळत असताना अडोल्फ नदीच्या पात्रात पडला. नदीच्या प्रवाहाला जोर होता आणि पाणी बर्फा इतकेच थंड होतं पण अडोल्फ सुदैवी ठरला आणि तो राहात असलेल्या घराच्या मालकाने त्याला वेळीच उडी मारून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला.