वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठीचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले असून ब्रुस ब्यूटलर, ज्युल्स हॉफमन आणि राल्फ स्टेनमन हे तिघे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Updated: Oct 9, 2011, 01:56 PM IST

झी २४ तास वेब टीम, स्टॉकहोम

 

वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठीचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले असून, ब्रुस ब्यूटलर, ज्युल्स हॉफमन आणि राल्फ स्टेनमन हे तिघे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिनी डिसेंबरमध्ये हे पुरस्कार दिले जातील.

 

"रोगप्रतिकारयंत्रणा कार्यरत राहण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या मूलभूत संकल्पनांविषयीची समजूत आमूलाग्र बदलून टाकणारे हे संशोधनकार्य आहे', अशा शब्दांत तिन्ही संशोधकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पुरस्कार प्रथम जाहीर करण्याच्या परंपरेनुसार स्वीडन येथील "कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट'ने 2011 साठीच्या मानकऱ्यांची नावे सोमवारी जाहीर केली. ब्यूटलर हे अमेरिकेचे, हॉफमन हे लक्‍झेम्बर्गचे (सध्या वास्तव्य फ्रान्स), तर स्टेईनमन हे कॅनडाचे (सध्या वास्तव्य अमेरिका) संशोधक आहेत.
शरीराच्या विविध यंत्रणांवर हल्ला करणाऱ्या जंतूंपासून बचाव करण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या अँटीबॉडीज्‌ आणि शरीरात घुसलेले परकी जीवाणू आणि विषाणूंचा सामना करून त्यांचा नायनाट करणाऱ्या पेशींच्या गुंतागुंतीच्या कार्यप्रणालीबाबतचे हे संशोधन आहे. नवीन औषधांचा शोध आणि प्रतिकारयंत्रणेतील त्रुटींवरील उपचारांसाठी तर ते मोलाचे ठरेलच; त्याशिवाय अस्थमा, ऱ्हुमॅटॉइड अर्थ्रायटिस यांसारख्या विकारांमध्येही ते विशेष उपयुक्त सिद्ध होईल. कर्करोग, संसर्ग, शरीरांतर्गत सूज व इतर विकारांमध्येही हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.
14 लाख 60 हजार डॉलरच्या पुरस्काराची निम्मी रक्कम ब्यूटलर आणि हॉफमन यांना विभागून, तर उर्वरित निम्मी रक्कम स्टेनमन यांना जाहीर झाली आहे. शरीरातील प्रतिकारयंत्रणेला चालना देणारे 'ग्राहक' (रिसेप्टर प्रोटिन) प्रथिन ब्यूटलर व हॉफमन या दोघांनी शोधून काढले आहे; तर स्वत:चे रेणू आणि अपायकारक शरीरबाह्य सूक्ष्माणू यांच्यातील फरक ओळखण्यासाठी शरीराला मदत करणाऱ्या डॅंड्राइट पेशींचा शोध स्टेनमन यांनी लावला आहे. वैद्यकीयशिवाय शांतता, विज्ञान, साहित्य आदी क्षेत्रांसाठीही नोबेल पुरस्कार दिले जातात.

Tags: