‎'गडाफी'चा गड पडला

लिबियाचा हुकुमशहा मुआमार गडाफीला पकडल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. सित्रे हा गडाफीच्या बालेकिल्ला अखेर पडला. गडाफीला जखमी अवस्थेत पकडलं असल्याचं सांगण्यात येत आहे. गडाफीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या असून त्याला गंभीर अवस्थेत नेण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.

Updated: Oct 20, 2011, 01:17 PM IST

झी 24 तास वेब टीम, लिबिया

 

लिबियाचा हुकुमशहा मुआमार गडाफीला पकडल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. सित्रे हा गडाफीच्या बालेकिल्ला अखेर पडला. गडाफीला जखमी अवस्थेत पकडलं असल्याचं सांगण्यात येत आहे. गडाफीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या असून त्याला गंभीर अवस्थेत नेण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.

[caption id="attachment_2927" align="alignleft" width="300" caption="गडाफी अटकेत"][/caption]

लिबियावर गेली ४२ वर्षे आपली पोलादी पकड कायम ठेवणाऱ्या गडाफीचा अखेर पाडाव झालाय. याआधी काही दिवसांपूर्वी गडाफीचा मुलगा खामिस गडाफी लढताना मारला गेला होता. लिबियाच्या राजधानीत त्रिपोलीत हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय.

 

अरब आणि आफ्रिका जगतात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या मुआमार गडाफी पर्वाची अखेर झाली आहे. आफ्रिकेच्या वाळवंटात असलेल्या लिबियाची लोकसंख्या अवघी ६० लाख इतकी आहे. पण तेलाच्या भरपूर साठ्यांमुळे लिबियावर कायम अमेरिका आणि पाश्चात्य देशांची नजर राहिली आहे

 

लिबियाचा राज इद्रिसला एका रक्तहीन क्रांतीद्वारे  पदच्युत करुन वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गडाफीने  लिबियावर ताबा मिळवला. आणि त्यानंतर तब्बल ४२ वर्षे त्याने आपली पोलादी पकड कायम ठेवली. गडाफीचा जन्म १९४२ साली सित्रे मध्ये झाला. बेंगाझी विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला पण त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडून तो सैन्यात भरती झाला. गडाफीने युरोप किंवा अमेरिकेबरोबर कायम वैर पत्करलं पण कधीही मान तुकवली नाही. तेलाच्या साठ्याने संपन्न असणाऱ्या या देशावर कायम अमेरिकेची वक्रदृष्टी राहिली

 

बेंगाझी आणि त्रिपोलीत हक्कसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याने भर चौकात फासावर चढवले. अबु सलीमच्या तुरुंगातील १२०० निशस्त्र कैद्यांना त्याने अत्यंत क्रुर पध्दतीने यमसदनी धाडलं. अवघ्या तीन तासात त्याने या सर्वांची हत्या घडवून आणली स्कॉटलंडमध्ये लॉकरबी पॅनअँम विमानात बाँम्बस्फोट  गडाफीच्या हुकुमावरुन घडवण्यात आला.

 

गडाफीने कोलंबियातील एफएआरसी आणि आयर्लंडमध्ये आयरिश रिपब्लिकन आर्मीला शस्त्र पुरवली होती.  लॉकरबी बॉम्बिंग प्रकरणी गडाफीने अनेक वर्षे आपण सहभागी असल्याचा इन्कार केला. या प्रकरणामुळे  लिबियावर अनेक वर्षे संयुक्त राष्ट्र संघाने निर्बंध लादले. अब्देल बसेत अल मगराही या लिबियन गुप्तहेराला यासाठी दोषी ठरवण्यात आलं. गडाफीच्या राजवटीने अखेर २००३ साली या हल्ल्या प्रकरणी जबाबदारी स्वीकारली आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना नुकसान भरपाई दिली.

 

लिबियाने अतिसंहारक शस्त्र साठी नष्ट केल्याने २००३ साली पाश्चिमात्य युरोपीय राष्ट्रांनी लिबियाशी परत एकदा संबंध प्रस्थापित केले. पाश्चिमात्य युरोपीय राष्ट्रांशी संबंध पूर्ववत झाल्याचा लिबियान अर्थव्यवस्थेला लाभ झाला त्यातही विशेषता पेट्रोलियम उद्योगाला विशेष फायदा झाला.