www.24taas.com, इस्लामाबाद
‘अल्लाह कसम ऐसी गलती दुबारा नही होगी’, असे पश्चात्तापदग्ध उद्गार काढून कसाबने मृत्यूच्या क्षणीतरी आपल्या चुकीची कबुली स्वत:शी दिली. कसाबच्या फाशीची बातमी त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली पण त्याची ही भावना मात्र पोहोचली नाही. ‘शत्रूच्या घरात घुसून हल्ला करणार्या पुतण्याचा आम्हाला गर्व आहे,’ असे फूत्कार कसाबच्या काकीने काढले आहेत.
कसाबची काकी शाहनाज सुघरा हिने पाकिस्तानातून हे विषारी फूत्कार काढले आहेत. सार्या जगाने दहशतवादी ठरलेल्या कसाबचा मृतदेह स्वीकारण्यासही पाकिस्तान सरकार पुढे आलेले नसताना त्याची उघडउघड बाजू या काकीने घेतली आहे. फरिदकोट गावातील कसाबच्या घरात खायचीही वानवा असताना तिने केलेले हे वक्तव्य पाकिस्तानातील लोकांची मानसिकताच दर्शविणारे आहेत.
कसाब हा दहशतवादी आहे, त्याने हल्ला केला आणि त्याला फाशी झाली या गोष्टीवर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया त्याच्या बालमित्रांनी दिली आहे. तो बंदूक चालवू शकतो, यावरही विश्वास नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कसाबचे शेजारी हाजीमोहम्मद सलीम यांनी कसाब हा घरातला सगळ्यात नम्र मुलगा होता, असे म्हटले आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्याचे वडील आजही दहीवडे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कसाबने आपल्या घरी कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचा दावा सलीम यांनी केला.
अजमल कसाब आणि फरिदकोट हे आता एक रहस्यच बनून राहील, अशी रणनिती पाकिस्तानने आखली आहे. कोणीही कसाबचे नाव घेण्यास, त्याच्या बद्दलची माहिती देण्यास तयार होत नाही. कसाबच्या फाशीचे वृत्त कळल्यानंतर जगभरातील पत्रकारांनी कसाबच्या गावी फरिदकोट इथे धाव घेतली, पण अनेक पत्रकारांना तिथून हुसकावून लावण्यात आले. काही पाकिस्तानी पत्रकार तिथे पोहोचले परंतु कसाबचे कुटुंब तिथून गायब झाल्याचे आढळून आले असून ते तिथे राहतच नसल्याची वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.