कराची : पाकिस्तानमधील कराची येथून सौदी अरेबियासाठी निघालेल्या विमानातून प्रवाशांनी चक्क उभा राहून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानातून सात प्रवाश्यांनी उभे राहून प्रवास केला.
२१ जानेवारीची ही घटना आहे. पीके-743 या विमानाने कराचीतून उड्डाण केले होते. या विमानाची प्रवासी क्षमता 409 प्रवाशांची आहे. मात्र प्रत्यक्षात विमानातून 416 प्रवासी प्रवास करत होते. सात प्रवासी हे विमानातील मधल्या जागेत उभे राहून प्रवास करत होते. अधिकृत यादीमध्ये अतिरिक्त प्रवाशांचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. तज्ज्ञांच्या मते, विमानातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास करणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असते. अतिरिक्त प्रवाशांकडे सीटबेल्ट नसल्याने त्यांच्याकडे ऑक्सिजन मास्कही नव्हते. आणीबाणीच्या काळात विमान सुरक्षितस्थळी उतरविताना ही बाब धोकादायक ठरू शकते.
विमानाचे उड्डाण केले तेव्हा ही बाब वरिष्ठ कर्मचाऱ्यानी लक्षात आणून दिली नाही म्हणून उड्डाण केल्यानंतर पुन्हा उतरणे शक्य नसते. त्यासाठी अतिरिक्त इंधन लागते जे कंपनीच्या हिताचे नव्हते असं विमानाचे कॅप्टन अनवर अदिल यांनी म्हटलं आहे.