डोनाल्ड ट्रम्पना धक्का, रिपब्लिकन नेते हिलरींना पाठिंबा द्यायच्या तयारीत

वादग्रस्त व्हिडिओनंतर अमेरिकेत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचंड अचडणीत आले आहेत.

Updated: Oct 13, 2016, 11:19 PM IST
डोनाल्ड ट्रम्पना धक्का, रिपब्लिकन नेते हिलरींना पाठिंबा द्यायच्या तयारीत title=

वॉशिंग्टन : वादग्रस्त व्हिडिओनंतर अमेरिकेत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचंड अचडणीत आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे प्रतोद पॉल रियान, 2008 साली अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार असलेले जॉन मॅक्केन यांच्यासह अनेक नेत्यांनी पाठिंबा काढल्यानंतर आता अनेक रिपब्लिकन नेते हिलरींना मत देण्याच्या मानसिकतेत पोहोचलेत.

याला अनेक राज्यांमधली राजकीय गणितं कारणीभूत ठरली आहेत. सध्या काँग्रेस आणि सिनेटमध्ये रिपब्लिकनांचं वर्चस्व आहे. सिनेटच्या 100 जागांपैकी 34 जागांच्या निवडणुका अध्यक्षीय निवडणुकीसोबतच होत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या बदनामीचा फटका या सिनेट जागांवर बसेल, अशी भीती रिपब्लिकन नेत्यांना वाटू लागली आहे.

त्यामुळे अब्राहम लिंकन यांचा वारसा सांगणाऱ्या या पक्षावर डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांना मात्र अद्याप परिस्थितीचं भान आलेलं नाही. पक्षांतर्गत विरोधकांवर आरोप करण्यातच ते धन्यता मानताना दिसत आहेत.