रिअॅलिटी शो : 'इसिस'च्या दहशतवाद्यांची बळींच्या नातेवाईकांसमोर कबुली!

 'इसिस'च्या रूद्रावताराला तोंड देण्यासाठी इराकने युद्धासोबतच इतरही मार्गांचा अवलंब केलाय. 'अल इराकिया' या सरकारी चॅनेलवर एक रिएलिटी टीव्ही शो प्रक्षेपित केला जातो. यात दोषी दहशतवाद्यांना पीडितांच्या कुटुंबियांसह बसवलं जातं. हा कार्यक्रम सध्या इराकमध्ये सनसनाटी निर्माण करतोय. 

Updated: Dec 24, 2014, 10:36 AM IST
रिअॅलिटी शो : 'इसिस'च्या दहशतवाद्यांची बळींच्या नातेवाईकांसमोर कबुली! title=

नवी दिल्ली :  'इसिस'च्या रूद्रावताराला तोंड देण्यासाठी इराकने युद्धासोबतच इतरही मार्गांचा अवलंब केलाय. 'अल इराकिया' या सरकारी चॅनेलवर एक रिएलिटी टीव्ही शो प्रक्षेपित केला जातो. यात दोषी दहशतवाद्यांना पीडितांच्या कुटुंबियांसह बसवलं जातं. हा कार्यक्रम सध्या इराकमध्ये सनसनाटी निर्माण करतोय. 

दर शुक्रवारी 'अल इराकिया' या सरकारी चॅनेलवर एक खळबळजनक कार्यक्रम प्रसारीत होताना दिसतोय. या कार्यक्रमात दोषी ठरलेले दहशतवादी आणि त्यांनी ठार मारलेल्यांचे नातेवाईक एकमेकांसमोर बसून सहभागी होतात... विचार करा मृतांच्या नातलगांनाच दहशतवाद्यांसमोर आणल्यावर काय होत असेल... काही जण रडत असतात... तर काही जण प्रचंड संतापलेलेही असतात... त्यांच्या संतापाचा सामना त्यांना करावा लागतो.

या शोसाठी गेल्या वर्षीपासून इराक सरकारने परवानगी दिलीय. म्हणजे गुन्हा घडला त्याठिकाणी चित्रीकरण करण्यापासून ते अगदी गुन्हेगाराला अटक, त्याच्याशी झालेली चकमक, त्याची कोर्ट केस आणि अखेरीस त्याच्या कारावासापर्यंत चित्रीकरणाची परवानगी इराक सरकारने दिलीय. 

याशिवाय पकडलेल्या सर्वच दहशतवाद्यांना आपापल्या गुन्ह्यांची कबुली टीव्ही कॅमेऱ्यासमोर देण्यास भाग पाडलं जातं. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी या कार्यक्रमाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, इराकी जनतेला हा कार्यक्रम आवडला आहे. आपल्या व्यथांना वाचा या कार्यक्रमाद्वारे फोडली जातेय, अशी त्यांची भावना आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.