www.24taas.com, रोम
इटालीत बुडालेल्या आलिशान क्रुझ कोस्टा कॉनकार्डिया मधील बेपत्ता असलेल्या २१ लोकांसाठी शोध मोहिम परत हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे वसईतल्या बेपत्ता रसेल विषयी लवकरच कळेल अशी आशा आहे.
पाणबुड्यांनी गुरुवारी परत एकदा शोध सुरु केला. समुद्र खवळेल असा अंदाज वर्तवण्यात आल्याने मोहिमेच्या संदर्भात अनिश्चितता होती. तब्बल ४५० दशलक्ष डॉलर्स मुल्याच्या कोस्टा कॉनकार्डियात ४२०० प्रवाशी होते.
जहाजाचा कप्तानाने आखून दिलेला मार्ग सोडून धोकादायक समुद्रात भरकटला आणि त्यानंतर ते एका खडकावर आदळलं. आता पर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. पाणबुडे आता सगळं लक्ष मागच्या आठवड्यात ज्या ठिकाणी पाच मृतदेह सापडले होते त्या ठिकाणी केंद्रित करत आहेत.
जहाज स्थिरावल्यानंतर शोध मोहिम परत हाती घेण्यात आली आहे. आता पर्यंत ११ मृत आणि २१ बेपत्ता प्रवाशांपैकी फक्त २७ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यात दोन अमेरिकन, १२ जर्मन, सहा इटालियन, चार फ्रेंच आणि प्रत्येकी एक हंगेरीयन, पेरुवियन आणि भारतीयाचा समावेश आहे.