पाचगणी, सातारा: पाचगणीत बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर जमीन विकण्याचा प्रकार समोर आलाय. अभिनेता आमीर खानचा चुलत भाऊ मन्सूर खान तसंच संजय दत्तचा वकील सी. बी. वाधवा यांची कन्या शोभा राजपाल यांच्या पाचगणीतल्या संयुक्त जमिनीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.
पांचगणी जवळ असणाऱ्या भिलार इथल्या सर्वे नं. ४६ अ मध्ये १११ आर ही बिगर शेती जमीन मन्सूर खान आणि शोभा राजपाल यांची संयुक्त आहे. या मिळकतीचे मालक कायम मुंबईत असतात. या परिस्थितीचा फायदा घेत एका महिलेनं आणि तिच्या मुलानं शोभा राजपाल यांच्या नावानं खोटी कागदपत्रे जमा केली. कोल्हापूर इथल्या एका पत्त्यावर खोटे निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्ड तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे भिलार इथली ५५.५ आर क्षेत्र जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक रहिवासी दिलीप गोळे आणि लक्ष्मण मोरे यांनी पन्नास लाखांना ही जमीन खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यानुसार एका इंग्रजी वर्तमानपत्रात शोभा राजपाल यांच्यावतीनं नोटीस देण्यात आली. मुंबईत शोभा राजपाल यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणातील अॅड. रामदास माने यांच्याशी संपर्क साधला आणि खरेदी विक्रिचा दस्त करू नका अशी सूचना दिली. परंतु अॅड. माने यांनी तरीही बारा जानेवारी रोजी महाबळेश्वर इथल्या निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचा दस्त केला.
व्यवहारासाठी ठरलेली रक्कम चेकनं न देता रोख स्वरूपात देण्यात आली. दस्ताची एक कॉपी नोंद करण्यासाठी तलाठी यांच्याकडे देण्यात आल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. शोभा राजपाल यांचे पुत्र विनय राजपाल यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
पाचगणी सारख्या घटना राज्यात इतरत्रही घडतायेत. जमिनीच्या मूळ मालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.