www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
`सत्यमेव जयते`च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर, मुद्द्यांवर भाष्य करणारा बॉलिवूड अभिनेता आमीर खान यानं आता मृत्यूदंडाच्या शिक्षेला विरोध दर्शविलाय.
असं असलं तरी आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं आमीर सांगतो. सभ्य मानवी समाजात मृत्यू दंडासारख्या क्रुर शिक्षेला स्थान नसावं, असं आमीरला वाटतंय. फाशीच्या शिक्षेने समाजातील गुन्हांच्या प्रमाणात घट होत नाही, फाशीची शिक्षा होणाऱ्या गुन्हेगारांमध्ये गरीब असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे, असं आमीरला वाटतंय.
`एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिल्यानंतर पुन्हा कोणीही त्याला जिवंत करू शकत नाही. त्यामुळे आपला यासारख्या शिक्षेला विरोध आहे. आपण सारे मानव आहेत. आपल्या वागण्याला मर्यादा आहेत. कधीतरी चुक होणारच त्यामुळे चुक सुधारण्याचे स्वातंत्र्य माणसाला असायला हवं` असं मत आमीर खान व्यक्त करतोय. अभिनेता आमीर खानने सत्यमेव जयते या कार्यक्रमाद्वारे सामाजिक विषयांवर जनजागृती केली आहे.
नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन, इन्फोसिसचे नारायण मुर्ती, सामाजिक कार्यकर्त्या अरूणा रॉय, गीतकार जावेद अख्तर, लेखक अमितव घोष, लेखक विक्रम सेठ यांनीदेखील याआधी आपला फाशीच्या शिक्षेला विरोध दर्शविलाय.
भारतामध्ये २००४ ते २०११ पर्यंत कोणत्याही आरोपीला फाशी देण्यात आलेली नाही. संसदेवर हल्ला करणारा अतिरेकी अफजल गुरू याला फेब्रुवारी २०१३ मध्ये तर २६/११च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी कसाब याला नोव्हेंबर २०१२ ला फाशी देण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.