मुंबई : आज बॉक्स ऑफिसवर या वर्षातील मचअवेटेड बेफिक्रे हा सिनेमा प्रदर्शित झालाये. सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे आदित्य चोप्रा या सिनेमाच्या निमित्ताने 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळलायं. तसेच यंदा आदित्यने त्याचा लकी मास्ककॉट आणि फेवरेट शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंगला या सिनेमात प्रमुख भूमिकेत घेतलेय. त्यामुळे आदित्यने केलेला हा बदल कितपत यशस्वी ठरणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
'बेफिक्रे' हा आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्त्व करणारा सिनेमा आहे.सिनेमातील रणवीर सिंग आणि वाणी कपूरची सिझलिंग केमिस्ट्री ब-याच दिवसांपासून चर्चेचा विषय़ ठरत होती. बिग स्क्रिनवरही या दोघांच्या सिझलिंग केमिस्ट्रीने कमाल केलीये.
पॅरिसमध्ये राहणारा धरम अर्थात रणवीर सिंग आणि शायरा अर्थात वाणी कपूर या दोघांच्या अवतीभोवती या सिनेमाची कथा फिरते. हे दोघेही अनौपचारिक प्रेमसंबंधांमध्ये असतात. यात ते आपण कधीच एकमेकांच्या प्रेमात पडणार नाही असा करार करतात. त्यानंतर नक्की काय होते ते तर तुम्हाला हा सिनेमा बघितल्यावरचं कळेल. या चित्रपटामध्ये रणवीर एका ‘स्टँडअप कॉमेडियन’च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे, तर वाणी एका ‘टुरिस्ट गाईड’च्या भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटामध्ये रणवीर आणि वाणी यांच्यावर बेसुमार चुंबनदृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तब्बल २३ वेळा रणवीर सिंग आणि वाणी कपूर या चित्रपटामध्ये एकमेकांचे चुंबन घेताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये १३ चुंबनदृश्ये असूनही सेन्सॉर बोर्डाने अगदी मोठ्या मनाने त्याला यूए प्रमाणपत्र दिले आहे. या सिनेमाचे चित्रीकरण ५० दिवसांत पॅरिस आणि मुंबई येथे करण्यात आले आहे. संपूर्ण जगभरात सिटी ऑफ लव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमधील काही नयनरम्य ठिकाणांवर चित्रित केलेली दृश्ये या चित्रपटाद्वारे पाहता येणार आहेत.
या सिनेमाचं प्लस पाईंट आहेत याची गाणी. सिनेमाची सगळीच गाणी हिट ठरली आहेत. विशाल-शेखरच्या संगीताने तरुणाईवर भुरळ घातलीये.
बॉलिवूडमध्ये प्रेमाची परिभाषा नव्याने प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या काही दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे आदित्य चोप्रा. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’पासून अगदी ‘रब ने बना दी जोडी’ पर्यंतच्या सर्वच चित्रपटातून प्रेमालाच प्रकाशझोतात आणणारा आदित्य चोप्रा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करतोयं.
गेला बराच काळ दिग्दर्शन क्षेत्रापासून दूर राहिलेले आदित्य चोप्रा एका नव्या धाटणीच्या कथानकासह प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या चित्रपटाचे कथानक आणि पात्र पाहता फ्रेंच संवाद आणि शब्दांचा या चित्रपटावर पगडा आहे. त्यामुळे चित्रपटातून काही सोपे फ्रेंच शब्द नक्कीच तुमच्यासाठी उपयोगाचे ठरतील. या चित्रपटासाठी वाणी आणि रणवीरने फ्रेंच भाषेचा रितसर अभ्यास केला होता. चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरमधून वाणी कपूरच्या फ्रेंच ‘वाणी’ची झलकही पाहायला मिळाली आहेच.
चौकटीबाहेरचे कथानक आणि नवी जोडी-कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम, परंपरा अशा सर्व विषयांपलीकडे जात ‘नो कमिटमेंट, नो अटॅचमेंट’ या नव्या सूत्रासह आदित्य चोप्रा एका चौकटीबाहेरच्या कथानकाला हाताळण्याचा प्रयत्न करतोयं. त्यामुळे या वीकेंडसाठी 'बेफिक्रे' खऱचं रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या चित्रपटाला मिळतायत 2.5 स्टार्स