मुंबई : महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण कवीवर्य मंगेश पाडगावकर यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे पण या स्मृतीदिनाला वादाचं गालबोट लागलंय. या वादाला निमित्त ठरलीय ती एक कविता. 'मी कुठं म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी' ही कविता नेमकी कुणाची असा वाद आता निर्माण झालाय.
ही कविता पाडगावकरांची नाही, तर आपली आहे, असा दावा धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केलाय. त्यामुळे ही परी कविता खरी कुणाची, असा सवाल आता निर्माण झालाय.
या नावानंच मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या गाण्याच्या ध्वनीचित्रफितीचं प्रकाशन आज संध्याकाळी आयोजित करण्यात आलंय. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणा-या या कार्यक्रमाला डॉ. अजित मंगेश पाडगावकर, संगीतकार अशोक पत्की, गायिका वैशाली सामंत, अभिनेत्री मधुरा वेलणकर, गायक अजित परब, गायक चिंतामणी सोहोनी आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही पाडगावकरांचीच कविता असल्याचा पाडगावकरांच्या मुलाचा दावा आहे. पुष्कर श्रोत्री यांनीच या गाण्याच्या ध्वनीचित्रफितीचं दिग्दर्शन केलंय. एवढंच नव्हे तर अनेकदा पाडगावकरांची कविता म्हणून आपण ती सादर केलीय असं पुष्कर श्रोत्रींचं म्हणणं आहे. यानिमित्तानं वाड्मय चौर्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.