मुंबई : ओ तूनी माय...हा अहिराणी सिनेमा उद्या मल्टीप्लेक्समध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे शिर्षक गावरान आहे. या सिनेमात खान्देशातील संस्कृतीची ओळख पाहायला मिळणार आहे.
खान्देशात अनेकांच्या तोंडावर ओ तूनी माय....हा सहज शब्द येतो. बोली भाषेला या सिनेमात प्राधान्य दिल्याचे सिनेमाच्या शिर्षकावरून दिसत आहे. त्यामुळे हा सिनेमा खान्देशी मूळ स्वभावाची ओळख करुन देईल, असे दिसत आहे.
खान्देशातल्या माणसाच्या ओठावर अगदी सहजपणे येणारे हे शब्द बोली भाषेतला रांगडेपणा जसे स्पष्ट करतात, तसेच मुळ स्वभावाची ओळखही करून देतात. हेच परावलीचे शब्द घेऊन अहीराणी भाषेतला पहिला चित्रपट दि. १२ डिसेंबरला खान्देशातल्या मल्टीप्लेक्समध्ये झळकणार आहे. बोलीभाषेतील परावलीच्या शब्दांची ओळख सिनेमाच्या माध्यमातून होणार आहे. हा अहिराणी भाषेतील पहिलाच प्रयोग या सिनेमाच्या माध्यमातून निर्माता विनोद चव्हाण यांनी केलाय.
माझे व्यवसाय क्षेत्र मूळात वेगळे आहे. मात्र, दीपक शिवदे यांनी मला या सिनेमाबाबत सांगितले. त्याची कथा ऐकवली. त्यानंतर मला सिनेमा करावासा वाटला. आपण आपल्या अहिराणीचे देणं लागतो, ही जाणीव झाली. त्यानंतर मी अहिराणीत हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. अहिराणी भाषेत एक गोडवा आहे, तो मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे विनोद चव्हाण सांगतात.
माझे मूळ गाव नंदूरबारमधील शहादा. खान्देशातील मातीत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे या मातीचे आपण देणे लागतो. अहिराणी भाषेचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतूने हा सिनेमा करण्याचे धाडस आपण केले, असे दिग्दर्शक दीपक शिवदे यांनी सांगितले. ही भाषा महाराष्ट्रात तळागाळात पोहोचावी आणि येथील स्थानिक कलागुणांना वाव मिळावा, म्हणून या सिनेमाची निर्मीती केल्याचे ते सांगतात. हा सिनेमा सर्वत्र सॅटेलाईटमार्फत प्रदर्शित होणार आहे. अहिराणी भाषेतला पहिला चित्रपट दि. १२ डिसेंबरला खान्देशातल्या मल्टीप्लेक्समध्ये झळकणार आहे.
खान्देशातील कलावंतांचा सहभाग असलेल्या या चित्रपटात आयटम साँगसह पाच गाण्यांचा देखील सहभाग आहे. या चित्रपटाचे वैशिष्ठ म्हणजे पाचही गाणी यु-ट्यूबवर चार लाखांपेक्षा जास्त युजर्सनी पाहिली आहेत. बोली भाषेतल्या या गाण्यांची ऑडीयो सिडी टी-सीरीज कंपनीने प्रथमच काढली आहे. महाराष्ट्रातल्या बोली भाषांमध्ये अहिराणीत निघालेली टी-सीरीजची ही पहिली ऑडीयो सिडी ठरणार आहे.
जवळपास ८० टक्के कलावंत खान्देशातील आहेत. चित्रपटाचा नायक नाशिकचा अमोल थोरात तर नायिका जळगावची गितांजली ठाकरे आहे. चित्रपटासाठी ५० लाखांपेक्षा अधिक खर्च आलाय.
सिनेमाविषयी...
खान्देशातील एक गाव पेरेजपूर. एक सर्वसामान्य गाव. विकासापासून वंचित गाव. गावातील सरपंच कपटी आणि कृष्णकृत्यात सहभागी असणारा. गावातील गरिब लोकांना सावकारीतून लुटून त्यांच्या जमिनी हस्तगत करण्याचा धंदा. शेतकऱ्यांची फसवणूक. महिला आणि मुलींना त्रास देणारा. सरपंच याचा धाक मोठा. त्यामुळे कोणीही त्याच्याविरोधात ब्र काढत नसे...पुढे ग्रामस्थ कसे यावर मात करतात...ते करण्यासाठी कोण पुढाकार घेतो...याची मांडणी या सिनेमात कऱण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.