शुभा राऊळ यांच्या उमेदवारीचा फायदा-तोटा कुणाला?

शिवसेनेने आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा संधी दिल्यामुळे, नाराज झालेल्या शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आणि दहिसरमधून उमेदवारी अर्जही दाखल केला. राऊळ यांच्या मनसे प्रवेशामुळे दहिसर मतदारसंघाची समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दहिसरला मोठे भगदाड पडले आहे. 

Updated: Oct 2, 2014, 09:54 PM IST
शुभा राऊळ यांच्या उमेदवारीचा फायदा-तोटा कुणाला? title=

मुंबई : शिवसेनेने आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा संधी दिल्यामुळे, नाराज झालेल्या शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आणि दहिसरमधून उमेदवारी अर्जही दाखल केला. राऊळ यांच्या मनसे प्रवेशामुळे दहिसर मतदारसंघाची समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दहिसरला मोठे भगदाड पडले आहे. 

शिवसेना-मनसे-भाजप मतविभाजनाचा लाभ काँग्रेसला होणार असल्याची चिन्ह आहेत. यामुळे विनोद घोसाळकर यांच्यासमोर विजयाचं आव्हान आहे.

नगरसेविकांना घोसाळकर अपमानास्पद वागणूक देत असल्याने आपण मनसेत प्रवेश केला आहे, असे राऊळ यांनी सांगितले. घोसाळकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ या नगरसेविकांनी काही महिन्यांपूर्वीच आवाज उठवला होता. या पार्श्‍वभूमीवर महिला नेतृत्वाचा चेहरा मतदारसंघाला देत शिवसेना राऊळ यांना येथून उमेदवारी देईल, अशी अपेक्षा होती. पण पुन्हा घोसाळकर यांनाच उमेदवारी मिळाल्याने राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आहे. 

दहिसरमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या मराठी आणि गुजराती उमेदवारांची एकगठ्ठा मते आतापर्यंत महायुतीला मिळत होती. या निवडणुकीत ती केवळ भाजप, शिवसेनेतच नाही तर राऊळ यांच्या प्रवेशामुळे मनसेतही विभागली जाणार आहेत. याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होऊ शकतो. मागील निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. योगेश दुबे यांनी येथे 33 टक्के मते मिळवली होती. विनोद घोसाळकरांना मिळालेली 45 टक्के मते निर्णायक ठरली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.