जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्याचा जवाहर नवोदय विद्यालयातल्या बलात्कार प्रकरणी दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय. मात्र हे शिक्षक अद्याप फरार आहेत.
शाळेतल्या तब्बल 55 विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी उजेडात आली होती. .. मात्र अद्याप या शिक्षकांना अटक करण्यात आलेली नाही...
अकोल्याच्या बाभुळगावमधल्या जवाहर नवोदय विद्यालयात घडलेल्या लैंगिक छळाच्या घटनेनं जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजलीय... शाळेतल्या राजन गजभिये आणि शैलेश रामटेक या दोन शिक्षकांनी शिक्षकी पेशालाच काळिमा फासलाय.
नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींशी हे दोघे नेहमी लगट साधण्याचा प्रयत्न करत असत... विद्यार्थिनींनी विरोध केला तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाही... विद्यालयातून काढून टाकू अशा धमक्या मिळत... त्या दबावामुळे विद्यार्थिनी या दोन शिक्षकांचा छळ निमूटपणे सहन करायच्या... मात्र एका विद्यार्थिनीनं धाडस करुन या किळसवाण्या प्रकाराची प्राचार्य आर.ए.सिंह यांच्याकडे तक्रार केली. मात्र राजकीय दबावातून ती तक्रार मागे घेण्यात आली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगेंकडेही करण्यात आली. त्यानुसार चौकशी केली असता 55 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान दोन्ही शिक्षक सध्या फरार आहेत.
झी मीडियानं यासंदर्भात विद्यालय आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता विद्यालयाकडून बोलण्यास कुणीही उपलब्ध झालं नाही. तर पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय. विद्यार्थिनींच्या पालकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय.
अलीकडच्या काळात निवासी शाळांमधल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.