थंड निवडणुका; भाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग!

लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजप नेत्यांच्या डोक्यात सॉलिड हवा शिरलीय. मात्र महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची नव्हे, तर मुख्यमंत्री कोण होणार? याची स्पर्धा आतापासूनच त्यांच्यात सुरू झालीय. निवडणुकांच्या तारखा काही जाहीर होण्याचं नाव घेईनात, पण, भाजपचे चार-पाच नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत.

Updated: Sep 12, 2014, 10:38 AM IST
थंड निवडणुका; भाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग! title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजप नेत्यांच्या डोक्यात सॉलिड हवा शिरलीय. मात्र महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची नव्हे, तर मुख्यमंत्री कोण होणार? याची स्पर्धा आतापासूनच त्यांच्यात सुरू झालीय. निवडणुकांच्या तारखा काही जाहीर होण्याचं नाव घेईनात, पण, भाजपचे चार-पाच नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात घवघवीत यश मिळालं. मोदींचं सरकार दिल्लीत सत्तेवर आलं. आता महाराष्ट्रातही आपलंच सरकार येणार, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांना आहे. म्हणूनच की काय, भाजपचे चार-चार नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरलेत. आपणच या पदासाठी कसे योग्य आहोत, हे दाखवण्यासाठी ते स्वतःला प्रोजेक्ट करू लागलेत.

देवेंद्र फडणवीस 
प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस सध्या राज्यात भाजपचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळं सरकारचं नेतृत्व करण्याची संधीही आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांना वाटत असावा. 'दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र' असा नाराच त्यांच्या समर्थकांनी दिलाय. फेसबुक पेजरवरूनही त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय.

विनोद तावडे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून विनोद तावडे यांनाही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडू लागलंय. स्वतःला प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांनी गेला महिनाभर राज्यात आपले स्वतंत्र दौरे सुरू केलेत. त्याशिवाय उद्योगपती आणि विविध घटकांशी त्यांनी संवाद सुरू केलाय. त्यांनाही फेसबुकवर मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय. विशेष म्हणजे तावडेंच्या फेसबुक पेजला देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लाईक आहेत.
 
एकनाथ खडसे
फडणवीस आणि तावडेंच्या तुलनेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या स्पर्धेत काहीसे मागे पडले होते. हे लक्षात येताच खडसेंनीही गेल्या काही दिवसात स्वतःला प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली. भाजपमध्ये मोठ्या नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचं जाहीर करून, महत्त्वाचे निर्णय ‘बी-4’वरून होतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री विजयकुमार गावित यांना त्यांनी भाजपात आणलं. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असावा, हे बिंबवण्याचा खडसेंचा प्रयत्न आहे.
 
पंकजा मुंडे
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे या आक्रमकपणे पुढे आल्यात. ओबीसींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या मुंडेंची जागा आता पंकजा यांनी घेतलीय. त्याची चुणुक धनगर आरक्षण आंदोलनात दिसून आली. संघर्षयात्रेच्या निमित्तानं पंकजा यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले होते. महाराष्ट्राचं नेतृत्व महिलेनं करायला हवं, असं पंकजा मुंडेंना वाटतंय.   

नितीन गडकरी
राज्यातील नेत्यांसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बनावं, असं अनेकांना वाटतं... आपल्याला राज्यात परत येण्याची इच्छा नाही असं गडकरी सांगत असले तरी निवडणूक निकालानंतर संधी मिळाली तर ते राज्याचे नेतृत्व स्वीकारतील असं त्यांचे समर्थक सांगतायत.
 
‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी...’ अशी अवस्था सध्या भाजपामध्ये आहे. सत्ता दूरच पण भाजपाच्या नेत्यांमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी तीव्र स्पर्धा आणि संघर्ष सुरू झाला आहे. या सत्तास्पर्धेमुळे भाजपा नेत्यांमधील दुरावा मात्र निवडणुकीपूर्वी वाढीस लागल्याचे चित्र असून पक्षाससाठी ते नुकसानदायी ठरू शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.