मातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'!

पर्यावरणाला धोकादायक ठरेलल्या प्लास्टिकवर सांगलीच्या एका जवानानं उत्तम उपाय शोधून काढलाय. हा पर्याय अंमलात आणला तर प्लास्टिक कचऱ्यापासून कायमची मुक्ती तर मिळेलच शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल.

Updated: Nov 5, 2016, 08:13 PM IST
मातीच्या नाही तर 'प्लास्टिकच्या विटा'! title=

रविंद्र कांबळे, सांगली : पर्यावरणाला धोकादायक ठरेलल्या प्लास्टिकवर सांगलीच्या एका जवानानं उत्तम उपाय शोधून काढलाय. हा पर्याय अंमलात आणला तर प्लास्टिक कचऱ्यापासून कायमची मुक्ती तर मिळेलच शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल.

नेमकी काय आहे ही 'आयडियाची कल्पना'

टाकाऊ प्लास्टिक ही सद्य स्थितीतली सर्वात मोठी समस्या आहे. पण या प्लास्टिकच्या कचऱ्यावर एका जवानानं चांगला उपाय शोधून काढलाय. टाकाऊ प्लास्टिकपासून त्यांनी विटा तयार केल्या. मुळच्या सांगलीतल्या खुजगावच्या सचिन देशमुख यांनी या विटा तयार केल्यात. 

२००८ सालापासून सचिन यावर काम करत होते. पण सुरूवातीला त्यांच्या या संशोधनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग, सचिन यांनी विटा बनवण्यासाठी स्व:तचं मशिन तयार करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना आर्थिक मदत दिली कर्नल ए. सी. कुलकर्णी आणि कर्नल करण धवन यांनी... वर्षभराच्या प्रयत्नांती 'वेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट' मशिन तयार झालं. सचिन यांनी पेटंटसाठीही नोंदणी केली. मशिनसाठी अवघा २० हजारांचा खर्च आला.

मातीच्या विटांपेक्षाही मजबूत...

१५ बाय ६ इंचाचे ब्लॉक बनवण्यासाठी सुमारे २ किलो प्लास्टिक कचरा आवश्यक असतो. १५० अंश सेल्सियसला त्याचे हायड्रोलिक मशीनद्वारे मोल्डिंग केलं जातं. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक एकत्रित झाल्यामुळे या ब्लॉकची मजबुती २० न्युटॉन इतकी आहे. साध्या मातीच्या विटेची मजबुती ३ न्युटॉन इतकी असते. या विटांपासून पेव्हिंग ब्लॉक्स, फूटपाथ, रस्तयावरील दुभाजक, रेल्वे रुळावरील स्लीपर्ससाठी उपयोग होऊ शकतो.

ही वीट दहा टनापर्यंत दाब सहन करू शकते. विटांची स्ट्रेंग्थ २४.१६ न्युटॉन पर एम एम स्क्वेअर इतकी आहे. जयसिंगपूरच्या जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातून सचिन यांनी या विटांची चाचणी करून घेतलीय.

देशातील प्रमुख ६० शहरांत दररोज १५ हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. यापैंकी ९ हजार टनांचा पूनर्वापर होतो. पण ६ हजार टन कचरा तसाच राहतो. एका विटेसाठी फक्त १० रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या ६ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया झाली तर सुमारे २ हजार १९० कोटींचा रोजगार उपलब्ध होईल.

आयुक्तांचं मदतीचं आश्वासन

हा प्रयोग पाहिल्यानंतर सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी पालिका हद्दीतल्या वेस्ट प्लास्टिकपासून फुटपाथ, आणि आयलँड बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन दिलंय. 

देशाचं रक्षण करत असतानाच सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाचं रक्षण या साऱ्याच गोष्टींचा सचिन विचार करत असतात. त्यामुळं सचिन यांचं संशोधन नक्कीच आदर्शवत असचं म्हणावं लागेल.