धक्कादायक : जात पंचायतीच्या पंचाकडून शरीर सुखाची मागणी

काशिकापडी सामाजातील जात पंचायतीचं वास्तव 'झी मीडीया'नं समोर आणलं.. आता गोंधळी समाजातील जात पंचायत कसा जाच करते, ते आम्ही उघडकीस आणतोय. विवाहित महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी करण्यापर्यंत या पंचांनी मजल मारलीय... चला पाहूयात काय आहे हे प्रकरण?

Updated: Jan 18, 2016, 09:00 PM IST
धक्कादायक : जात पंचायतीच्या पंचाकडून शरीर सुखाची मागणी title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : काशिकापडी सामाजातील जात पंचायतीचं वास्तव 'झी मीडीया'नं समोर आणलं.. आता गोंधळी समाजातील जात पंचायत कसा जाच करते, ते आम्ही उघडकीस आणतोय. विवाहित महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी करण्यापर्यंत या पंचांनी मजल मारलीय... चला पाहूयात काय आहे हे प्रकरण?

नाशिकच्या काझीगडी भागात राहणारे हे आहेत दीपक आणि सोनी भोरे.. जातीनं गोंधळी... परभणीच्या सेलू तालुक्यातलं हे दाम्पत्य जात पंचायतीच्या छळाला कंटाळून घरदार सोडून नाशिकमध्ये पळून आलं. गोंधळी समाजाच्या पंचांनी दीपकला बळजबरीनं भिशीत सहभागी व्हायला भाग पाडलं. त्याच्याकडं पैसे नसल्यानं पंचांनीच व्याजाने त्याला पैसे दिले. मात्र 60-70 हजाराच्या मोबदल्यात पंचांनी आता 7-8 लाख रूपयांची मागणी करत, छळ सुरू केलाय... 

पंचांनी पैशांसाठी त्यांच्या घरातली भांडीकुंडी विकून खाल्ली. अगदी घराचे पत्रेही विकून त्याला रस्त्यावर आणलं. पण एवढं करूनही पंचांचा छळ थांबला नाही. पैसे नसतील तर बायकोला आमच्या हवाली कर, असं सांगत त्या नराधम पंचांनी विवाहितेच्या अब्रूवरच घाला घातला. आपली अब्रू वाचवण्यासाठी भोरे दाम्पत्यानं नाशिक गाठलं.

पण इथंही जात पंचायतीच्या भूतानं पिच्छा सोडलेला नाही. या दोघांना ज्यांनी आसरा दिला त्या इतर कुटुंबांनाही पंचांनी वाळीत टाकलय.  नाशिक शहरात अशी सुमारे २५ ते ३० गोंधळी समाजाची कुटुंब आहेत, ज्यांना पंचांनी जातीतून बहिष्कृत केलंय. झालेली लग्न मोडण्यात आलीत. सोनी भोरेच्या बहिणीलाही सासरच्या मंडळींनी नांदवण्यास नकार दिलाय. आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याची दखल घेऊन, कायदेशीर प्रक्रिया सुरू केलीय.

पैशांसाठी छळ करणा-या, बेकायदेशीर सावकारी करणा-या आणि विवाहितेकडं शरीरसुख मागणा-या या गोंधळी जात पंचायतीच्या पंचांवर आता सरकार काय कारवाई करतंय, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय...