कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहराचं आयसिस कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. नवी मुंबईतल्या आर्शिद कुरेशीच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित आणखी एकाला एटीएसनं कल्याणमधून ताब्यात घेतलंय.
आयसिससाठी तरुणांचं ब्रेनवॉश करणाऱ्या रिझवान खानवर एटीएसनं झडप घातलीय. गेल्या दोन वर्षांपासून कल्याणमध्ये पत्नी आणि मुलीसह राहणारा संसारी माणूस... मात्र आयसिस या जहाल जागतिक अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला एटीएसनं अटक केलीय.
नवी मुंबईमध्ये अटक करण्यात आलेल्या आर्शिद कुरेशीचा हा साथीदार असल्याची माहिती समोर आलीय. रिझवान आणि आर्शिद हे वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईकचे निकटवर्ती मानले जातात... या दोघांनी केरळमधल्या २१ तरुणांना धर्मांतर करून अतिरेकाच्या मार्गावर लोटल्याचा आरोप होतोय.
शाळेतल्या किंवा नुकत्याच कॉलेजमध्ये गेलेल्या तरुण-तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचं. त्यांच्याशी जवळिक निर्माण करून त्यांना आधी इस्लामचं महत्त्व पटवून द्यायचं. सिस्टिमॅटिक ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर घडवायचं आणि मग जन्नत हवी असेल तर आयसिससारख्या संघटनेमध्ये लढलं पाहिजे हे त्यांच्या मनात भरायचं, अशी रिझवान-आर्शिदच्या कामाची पद्धत होती.
या दोघांच्या अटकेनंतर आता झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेशी संबंधित आणखी काही जणांची चौकशी केली जाणार आहे. रिझवानला तातडीनं मुंबईतल्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला २५ जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांड देण्यात आलीय.
दरम्यान, रिझवान राहात असलेल्या सूर्यमुखी इमारतीतल्या रहिवाशांना या घटनेमुळे धक्का बसलाय. १०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलीसह तो भाड्यानं राहात होता. तो घरातच ट्युशन घेत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिलीय. छाप्याची माहिती मिळताच त्याच्या घरमालकानं विक्रोळीहून कल्याणला धाव घेतली.
२०१४ मध्ये चार युवक आयसिसमध्ये सामिल होऊन सीरियाला गेल्यामुळे कल्याणचं आयसिस कनेक्शन उघड झालं होतं. यातला आरीब माजिद परत येताच त्याला अटक करण्यात आली, तर सलीम तानकी मारला गेल्याचं वृत्त आलं. आता पुन्हा एकदा कल्याणमधून आयसिसशी संबंधित कारवाई झाल्यामुळे अतिरेक्यांची पाळंमुळं शहरात किती खोलवर रुजली आहेत, हे शोधून काढणं गरजेचं आहे.