मुंबई : मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे. पक्षाला 19 डिसेंबरला पाठवलेल्या पत्रातून तसं आयोगानं कळवलं आहे. त्यामुळे आता मनसेचे इंजिन उजवीकडून डावीकडे धावण्याच्या दिशेवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालं आहे.
याआधी पक्षस्थापनेनंतर 2007 साली झालेल्या मुंबईसह अन्य महापालिका निवडणुका मनसेनं कपबशी, विमान अशा विविध चिन्हांच्या माध्यमातून लढवल्या होत्या. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवर पक्षाला रेल्वे इंजिन ही निशाणी मिळाली होती. त्याची दिशा उजवीकडून डावीकडे अशी होती.
2012 मधे झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंजिनाची दिशा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बदलून घेतली. मराठी भाषा लिखाण पद्धतीप्रमाणे मनसेचे इंजिन डावीकडून उजवीकडे धावू लागले होते.
या महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली झाली, मात्र 2014 मधे झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मात्र अपयशाला सामोरं जावं लागलं, त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार इंजिनाची दिशा पूर्ववत करण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेत राज ठाकरे यांनी घेतला.