मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असून, दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळून निघालाय. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्येचं सत्र सुरू केलंय. दुष्काळाच्या दुष्चक्रात अडकलेल्या या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र, मायबाप सरकार सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत मश्गूल आहे. शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही, त्यांना किती मंत्रीपदं द्यायची, यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरबैठका सुरू आहेत. एवढंच नव्हे तर 5 डिसेंबरला होणारा शपथविधीचा कार्यक्रमही थाटामाटात करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय. याबद्दलच्या 'लॅव्हिश' चर्चाही जोरात सुरू आहेत.
राज्यात दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरुय. या आत्महत्या थांबवणं हे फडणवीस सरकारसमोर मोठं आव्हान असेल
महाराष्ट्रात सातत्यानं पडणारा दुष्काळ बळीराजाच्या जीवावर उठलाय. दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून बळीराजा आत्महत्येचा मार्ग पत्करतोय. गेल्या 14 वर्षांची आकडेवारी पाहता राज्यात दर दिवसाला सरासरी तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. तर यंदाच्या वर्षी म्हणजेच 2014 च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत 1 हजार 410 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. 2001 पासून ऑक्टोबर 2014 पर्यंत राज्यात तब्बल 17 हजार 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.
यंदा ऑक्टोबरनंतर मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची स्थिती अत्यंत भीषण बनलीय. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आघाडी सरकार जबाबदार असल्याचं सातत्यानं म्हणणाऱ्या फडणवीस सरकारपुढे आता या आत्महत्या रोखण्याचं आव्हान आहे. पण ते होणार कसं? कारण सरकार बदललं तरी शेतकऱ्यांना सरकारी छापाची तीच तीच उत्तरं ऐकायला मिळतायत.
आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं मानसिक, आर्थिक प्रबोधन करणं गरजेचं झाल्याचं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.
ऐन हिवाळ्यात दुष्काळी स्थिती जाणवू लागलीय. जसजसा उन्हाळा जवळ येईल तशी दुष्काळाची तीव्रता आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय. देवेंद्र फडणवीस सरकारनं तातडीनं पावलं उचलून आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन बळीराजाची या दुष्टचक्रातून सुटका करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. फडणवीसांचं सरकार या अपेक्षांना जागणार का...?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.