अकोला : भाजपचे अनेक मंत्री विविध कारणांनी अडचणीत सापडले असतानाच, आता राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. दोन मतदारसंघात नावे असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडलाय.
रणजीत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं अकोला पूर्व आणि मूर्तीजापूर या दोन्ही मतदारसंघांत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे रणजीत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
रणजीत पाटील यांनी २०१०मध्ये विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना, आपण अकोला पूर्व मतदारसंघातले मतदार असल्याचं म्हंटलं होतं. मात्र, अकोला पूर्व सोबतच मूर्तीजापूर मतदारसंघातही रणजीत पाटील यांचं नाव मतदारयादीत असल्याचं समोर आलं आहे.
रणजीत पाटील, रंजीत पाटील आणि अण्णासाहेब पवित्रकार, अशी तीन नावं राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी धारण केली आहेत. रणजीत पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाची नावं अकोला पूर्व आणि मूर्तीजापूर अशा दोन मतदारयाद्यांमध्ये आहेत. दोन मतदारयाद्यांमध्ये नावं टाकताना त्यांनी सरकारचीही फसवणूक केली आहे. कारण दोन्ही ठिकाणी माणसं तीच, मात्र नावं वेगवेगळी आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.