पुणे : पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्वाची बातमी आहे. खडकवासला धरण अखेर भरलं आहे. यामुळे लवकरच खडकवासला प्रकल्पातील चार ही धरणात मिळून मंगळवारी दुपारी 12 वाजता 45 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
मंगळवारी दुपारपर्यंत खडकवासला धरणात 95 टक्के पाणीसाठा जमा झाला होता, पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
खडकवासला धरणात 1.90 टीएमसी म्हणजेच 95 टक्के पाणीसाठा जमा झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. या धरणातून 1 हजार 326 क्युसेक पाणी कालव्यात सोडले जात आहे. कालव्याच्या या पाण्यातून हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील अनेक गावांसाठी पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
या भागातील विहिरी तलाव या पाण्यातून भरून घेतले जातात. त्याचबरोबर, पुणे, वारजे, पर्वती एनडीए-पाषाण, कोंढवे- शिवणे, नांदेडसिटी जलवाहिनीतून पिण्यासाठी 400 क्युसेक ही पाणी सोडले जात आहे.
खडकवासला धरणात पावसाचा जोर कायम असल्यास दर तासाला 10 दशलक्ष घनफूट पाणी वाढत आहे. पाऊस नसल्यास तासाऐवजी दोन- तीन तासात एवढी वाढ होते.
चार ही धरणातील पाणीसाठ्याने जून अखेरीस तळ गाठला होता. 11 जुलै 2014 रोजी चार ही धरणात 1.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. 12 जुलै पासून पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत गेली. मागील 15 दिवसात पाणीसाठ्या समाधानकारक वाढ झाली आहे. आणखी पंधरा दिवस असाच पाऊस पडला पाहिजे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.