सांगली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आणीबाणीविषयक मत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं म्हटलं आहे.
शरद पवार तासगावात बोलतांना म्हणाले, आणीबाणीच्या वेदना ज्यांना सहन कराव्या लागल्या, त्यापैकी लालकृष्ण अडवाणी एक होते, त्याकाळात त्यांनी तुरूंगवासही भोगला आहे. त्यामुळे अडवाणींसारखे ज्येष्ठ नेते देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची भीती व्यक्त करतात, याचा अर्थ त्यांचे बोलणे निश्चितच गांभीर्याने घेतले पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
तासगाव तालुक्यातील अंजनीच्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या नामकरण आणि इमारतीचे हस्तांतरण समारंभासाठी शरद पवार आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. ललित मोदी यांना भेटलो यात गैर काय, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
लालकृष्ण अडवाणी यांचे विधान, बिहारमधील राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादीची भूमिका, ललित मोदी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केल्याचा आरोप, राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अशा विषयांवर त्यांनी उत्तरे दिली.
छगन भुजबळ यांच्यावर एसीबीने केलेल्या कारवाईवर पवार म्हणाले, "यापूर्वीची छगन भुजबळ यांच्याबाबतची भूमिका आम्ही आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केली आहे. मी ही काही काळ राज्यात गृहमंत्री म्हणून काम केले आहे, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळी एखादया प्रकरणाचा तपास सुरू असतो. त्यावेळी तपास यंत्रणेने काही बोलायचे नसते. मात्र सद्या भुजबळ प्रकरणामध्ये तपासयंत्रणेला काय तपास केला, हे बोलण्यात जादा रस असल्याचे दिसते'.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.