महादेव जानकरांची वादग्रस्त कारकीर्द...

 राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर मागील वर्षभरापासून वादग्रस्त ठरले आहेत. २०१४ पासून जानकरांचा राजकीय आलेख चढता आहे, पण राजकारणातील प्रगल्भता आणि संयम मात्र त्यांना अद्याप शिकता आला नाही. जानकरांच्या मागील दोन वर्षांतील वादग्रस्त कारकीर्दीवर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांचा हा विशेष रिपोर्ट..

Updated: Dec 6, 2016, 07:00 PM IST
महादेव जानकरांची वादग्रस्त कारकीर्द... title=

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर :  राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर मागील वर्षभरापासून वादग्रस्त ठरले आहेत. २०१४ पासून जानकरांचा राजकीय आलेख चढता आहे, पण राजकारणातील प्रगल्भता आणि संयम मात्र त्यांना अद्याप शिकता आला नाही. जानकरांच्या मागील दोन वर्षांतील वादग्रस्त कारकीर्दीवर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांचा हा विशेष रिपोर्ट..

राज्यात ऑक्टोबर २०१४ ला भाजपाचे सरकार सत्तेवर आले आणि भाजपाला साथ देणा-या पक्षांच्या नेत्यांचे राज्यातील राजकीय वजनही वाढले. यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचाही समावेश आहे. धमगर समाजाचे नेते अशीही ओळख असणा-या जानकर यांची राजकारणात दखल घेतली जाऊ लागली. सत्ता आल्यानंतर भाजपाने जानकर यांना विधानपरिषदेवर आमदार केले. मात्र आमदार झाल्यावर अनेक महिने मंत्रीपद मिळत नसलेले जानकर अस्वस्थ झाले आणि त्यांनी थेट मंत्रीपद मिळत नसल्याने भाजपावरच नाराजी आणि टीका करत त्यांनी आमदारकी सोडण्याची धमकीच दिली.

यापूर्वीही अनेकदा जानकरांनी वादग्रस्त विधाने केला होती. पण जानकरांचे तेव्हा राजकारणात महत्त्वाचे स्थान नव्हते. आता जानकर मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाची दखल घेतली जात आहे. कदाचित हिच बाब विसरून आणि मंत्रीपदाची जबाबदारी विसरून जानकर बेछूट वागत आहेत आणि विधाने करत आहेत. जानकरांच्या काही बेजबाबदार विधानांवर लक्ष टाकले तर ही बाब लगेच लक्षात येईल.

वादग्रस्त प्रसंग...

- गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपंचायतीतील काँग्रेस उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी मंत्री म्हणून निवडणूक अधिका-यावर दबाव टाकणे
- भगवानगडावर दस-याला झालेल्या सभेत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर खालच्या भाषेत केलेली टीका
- पक्षातील जिल्हा अध्यक्ष आणि इतर पदांसाठी जाहीरपणे बोली लावून ती पदे विकणे
- पंकजा मुंडेंचे जानकर समर्थक असल्याने पंकजांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करण्याचे विधान
- मंत्रीपद मिळावे म्हणून राधे माँचे घेतलेले आशिर्वाद आणि नंतर त्याचा केलेले इन्कार

महादेव जानकरांची अशा आणखी काही वादग्रस्त विधानांचे दाखले देता येतील. सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कारणांसाठी केला नाही आणि बेजबाबदार वक्तव्य टाळली नाही तर अडचणी वाढतात आणि राजकीय कारकीर्द अडचणीत येते. वारंवार वादग्रस्त विधाने आणि कृती करून नंतर त्याचा इन्कार करण्याची अथवा माफी मागण्याची वेळ जानकरांवर आली आहे पण यातून सध्या तरी जानकर काहीही शिकलेले नाहीत असेच दिसते.