रायगड : हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबई आणि उरणमधले खाडी किनारे परदेशी पक्ष्यांनी भरुन गेले आहेत. बगळ्याप्रमाणे उंच पण गुलाबी रंगाची मान असलेला फ्लेमिंगो, सकाळच्या वेळी जणू गुलाबी रंगाची चादर पसरवत असल्याचा भास या ठिकाणी निर्माण होतो.
फ्लेमिंगोंसोबतच भारतातला सर्वात उंच आणि थोडा राखडी रंगाचा असा ग्रे हेरोन हे सुद्धा सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
तसंच बदकासारखे दिसणारे लडाखहून आलेले वुड सेंड पाय्यिपर, रुडी शेल्ड डक, लांब चोच आणि पांढरा आणि काळा रंग असलेला शेकाट्या, असे थोडेथोडके नव्हेत तर एकूण 260 जातींचे स्थलांतरीत पक्षी सध्या उरणच्या खाडी किनारी मुक्कामाला असल्याची माहिती, पक्षी निरीक्षकांनी दिलीय.
इथल्या खरफुटीवर हे पक्षी आपलं भक्ष शोधतात. या परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमी मोठी गर्दी करत आहेत.