नवी दिल्ली : पुण्याच्या एका दानशूर व्यक्तीनं आपली सगळी संपत्ती देशातील सैनिकांसाठी अर्पण केलीय.
पुण्यातील कोथरुड भागात राहणाऱ्या 72 वर्षीय प्रकाश केळकर यांनी आपली संपत्ती लष्करी मदत निधीच्या नावे केलीय. यामध्ये त्यांच्या बँक डिपॉझिटसह इतर संपत्तीचाही समावेश आहे. स्वत:साठी किंवा कुटुंबीयांसाठी त्यांनी हातचं काहीही न राखता आपली संपत्ती दान करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय.
आपल्या देशातील सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत... ते सीमेवर उभे आहेत... म्हणूनच आज आपण मजा-मस्ती करू शकतो... त्यांच्यासाठी केवळ सरकारनंच काहीतरी करावं, अशी अपेक्षा का करावी? लोकंही आपापल्या परीनं त्यांना मदत करू शकतात, असं केळकर म्हणतात.
आपल्या पत्नीसोबत त्यांनी आपलं मृत्यूपत्र बनवलंय. यामध्ये आपली 90 टक्के संपत्ती सैन्यासाठी सरकारकडे सुपूर्द केली जाईल तर 10 टक्के एनजीओला मिळणार आहे.
मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रालयालाही केळकर यांच्या या मृत्यूपत्रानं सुखद धक्का बसला. पहिल्यांदाच एका व्यक्तीनं आपली सारी मिळकत देशासाठी देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय, अशी प्रतिक्रिया गृह मंत्रालयाकडून मिळतेय.