'झिंगाट' गाण्यावरून रक्तपात, ९ जण गंभीर जखमी

 संपूर्ण महाराष्ट्राला झिंग लावणारे 'झिंग झिंग झिंगाट'  गाणे एका लग्नाच्या पार्टीत मोठया रक्तपाताचे कारण ठरले. झिंगाट गाणे वाजवायचे की, जय जय महाराष्ट्र यावरून झालेल्या वादातून दोन गटांनी परस्परांवर चाकू, कु-हाडीने वार केले. यात एकूण नऊ जण जखमी झाले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 9, 2017, 08:04 PM IST
 'झिंगाट' गाण्यावरून रक्तपात, ९ जण गंभीर जखमी  title=

डोंबिवली  :  संपूर्ण महाराष्ट्राला झिंग लावणारे 'झिंग झिंग झिंगाट'  गाणे एका लग्नाच्या पार्टीत मोठया रक्तपाताचे कारण ठरले. झिंगाट गाणे वाजवायचे की, जय जय महाराष्ट्र यावरून झालेल्या वादातून दोन गटांनी परस्परांवर चाकू, कु-हाडीने वार केले. यात एकूण नऊ जण जखमी झाले. 

डोंबिवलीच्या सागाव गावामध्ये राहणा-या रतन म्हात्रे यांनी ४ मार्च रोजी मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने एक पार्टी दिली होती. त्यात ही घटना घडली. 

पार्टीला आलेल्या पाहुणे मंडळीनी मद्यपान करुन रात्रभर डीजेच्या तालावर ठेका धरला होता. पहाटेच्या सुमारा नवरदेवाच्या मित्रांना झिंगाट गाण्यावर नाचायचे होते. पण झिंगाट गाणे भरपूरवेळा वाजवल्यामुळे आता जय जय महाराष्ट्र गाण्यावर नाचण्याची इच्छा अन्य पाहुण्यांनी व्यक्त केली. दोन्ही बाजूंमध्ये यावरुन सुरू असलेल्या शाब्दीक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले.
 
पाहुणे मंडळींवर मद्याचा अंमल असल्यामुळे कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी थेट चाकू, कु-हाडी काढून परस्परांवर वार केले आणि लग्नाची ही पार्टी रक्तरंजीत झाली. 

 या हाणामारीत नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे मानापाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजनान काबडुले यांनी सांगितले.