कृपाशंकर सिंहांना केव्हाही होऊ शकते अटक

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या कृपाशंकर सिंह यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Feb 29, 2012, 06:15 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या कृपाशंकर सिंह यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशानं कृपाशंकरसिंह यांच्याविरोधात फसवणूक, कट रचणे, पुरावे नष्ट करणे, फौजदारी विश्वासघात, बोगस इच्छापत्र, बनावट कागदपत्र, भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर करुन भ्रष्टाचार असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कृपाशंकर सिंह यांची पत्नी मालती देवी, मुलगा नरेंद्र मोहन, सून अंकिता, मुलगी सुनीता जावई विजय सिंग यांचीही नावं आहेत. त्यामुळं कृपाशंकर सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही अटक होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह यांच्याविरोधातील एफआयआरमध्ये टाकलेली कलमं पाहता त्यांना अटक करुन कोर्टात हजर करावं लागेल असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आणि त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश गेल्याच आठवड्यात हायकोर्टानं दिले होते.

 

याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर कृपाशंकर यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुनही गच्छंती करण्यात आली होती. मात्र यासाठी मुंबई मनपा निवडणुकीतल्या अपयशाचं कारण देण्यात आलं होतं. कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँकांतल्या व्यवहारात अनियमितता असल्याप्रकरणी, त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

 

कृपांवर एफआयआरमध्ये टाकलेली कलमं पुढीलप्रमाणे :

429, 120 ब, 201, 409, 467, 468, 13/1ड, आणि 13/1इ