सत्तेसाठी दोन्ही कॉंग्रेसचे गळ्यात गळे

Updated: Jun 20, 2012, 08:07 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
कॉंग्रेस आणि  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही, यावर बराच खळ झाला. चर्चा झडत होती. अखेर सत्तेसाठी दोन्ही कॉंग्रेसचे गळ्यात गळे घालण्याचे ठरविले आहे. आघाडीसाठी ३० नोव्हेंबरपूर्वी दोन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत शिक्‍कामोर्तब केले जाईल.
 
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांच्या फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत आघाडी करण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहमती झाली. प्रत्येक पालिकेत कशा पद्धतीने जागावाटप करायचे, याचे सूत्र ठरविण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांच्या समितीला देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.
 
मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी यापूर्वीच घेतला होता. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, नागपूर, अमरावती, अकोला आणि सोलापूर या महापालिकांत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत; त्यामुळे आघाडीच्या निर्णयात या महापालिकांची भूमिका महत्त्वाची होती. आधीच्या चर्चेत प्राथमिक सहमती झाल्यानंतर आज सह्याद्री अतिथिगृहात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.
 
त्या त्या महापालिकांतील आघाडीचे सूत्र, जागावाटप ठरविण्यासाठी तेथील स्थानिक नेत्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. स्थानिक नेत्यांची बोलणी फिसकटली, तर आघाडीचा निर्णय लादला जाणार नाही, यावरही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे एकमत झाले.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुंबई आणि ठाणे महापालिकेत कॉंग्रेससोबत आघाडी करायची आहे; तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडीसाठी कॉंग्रेस आग्रही आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कायम स्वबळावर लढत आले आहेत. त्यामुळे या महापालिकांत आघाडी करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.