ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : नोटाबंदी अस्तित्वात येऊन 42 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप परिस्थिती सुधारलेली नाही. मात्र या काळात सरकारनं घोषणांचा जोरदार पाऊस पाडलाय... सातत्यानं धोरणं बदलणं सुरू ठेवलं. सरकार, रिझर्व्ह बँक आणि नीती आयोगानं वारंवार निर्णयांमध्ये बदल केले... 42 दिवसांत तब्बल 52 घोषणा करण्यात आल्यात..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी नोटा बंदीची घोषणा केली आणि देशामध्ये आर्थिक वादळ उठलं. पहिल्या दिवशी स्वतः मोदींनी 11 महत्त्वाच्या घोषणा केल्या... त्यानंतर सुरू झाला घोषणांचा आणि निर्णय फिरवण्याचा सिलसिला... नोटाबंदीनंतर 42 दिवसांत तब्बल 52 घोषणा सरकारनं केल्या...
8 नोव्हेंबरला 500 आणि एक हजारच्या नोटा मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याची पहिली महत्त्वाची घोषणा...
जुन्या नोटा हॉस्पिटल, पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स इथं पुढले 72 तास चालतील, असं यावेळी जाहीर करण्यात आलं...
दुसऱ्या दिवशी बँका ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आल्या, तर ATM दोन दिवस बंद राहती असं सांगण्यात आलं...
11 नोव्हेंबरला जुन्या नोटा विशिष्ट सेवांसाठी स्वीकारायची मुदत 14 तारखेपर्यंत वाढवण्यात आली....
13 तारखेला रिझर्व्ह बँकेनं आठवड्याची पैसे काढण्याची मर्यादा 20 हजारांवरून 24 हजार केली.
जुन्या नोटा बदलून घेण्याची मर्यादाही साडेचार हजारांवर नेण्यात आली.
14 तारखेला रिझर्व्ह बँकेनं देशातल्या सर्व जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास आणि बदलण्यास बंदी घातली...
याच दिवशी पेट्रोल पंपांसह महत्त्वाच्या सेवांसाठी जुन्या नोटांची मुदत आणखी वाढवण्यात आली..
नोटा बदलून घेताना घोटाळा लक्षात आल्यावर 15 तारखेला बोटाला शाई लावण्याची टूम सरकारनं काढली...
17 तारखेला शेतकऱ्यांना पैसे काढण्याची मुदत आठवड्याला 25 हजारावर नेत आणखीही काही घोषणा करण्यात आल्या...
मात्र याच दिवशी काऊंटरवर नोटा बदलून घेण्याची मुदत साडेचार हजारावरून अचानक 2 हजारावर आणण्यात आली.
23 तारखेलाही पुन्हा 9 घोषणा करण्यात आल्या. यात जिल्हा बँकांना पगारासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारनं दिले.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारनं जुन्या नोटा बदलून घेण्यास सर्व बँकांना बंदी घातली. आता केवळ नोटा जमा करता येणार होत्या.
याखेरीज केवळ 500च्या जुन्या नोटा टोलनाके, हॉस्पिटल्समध्ये चालतील, असं जाहीर करण्यात आलं.
1 डिसेंबरला जुन्या 500च्या नोटा टोलनाक्यांवर देण्याची मुभा 2 तारखेपासून अचानक बंद करण्यात आली. यापूर्वी 15 डिसेंबरपर्यंत नोटा चालतील, असं सरकारनं जाहीर केलं होतं.
8 तारखेला नोटाबंदीला 1 महिना होत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या.
15 डिसेंबरला नीती आयोगानं चक्क ऑनलाईन व्यवहारांवर लकी ड्रॉ स्कीमचीच घोषणा केली.
19 तारखेला सरकारनं पुन्हा एकदा धोरण बदलत 500 आणि हजारच्या जुन्या नोटा एका व्यक्तीकडून एकदाच स्वीकारल्या जातील, अशी घोषणा केली....
या काळात केंद्र सरकारनं आयकर कायद्यामध्ये सुधारणा करून आणखी एक अभय योजना जाहीर केली. 50 टक्के दंड आणि 25 टक्के रक्कम सरकारी योजनांमध्ये बिनव्याजी गुंतवल्यावर काळा पैसा पांढरा करून घेता येणार आहे...
गेल्या दीड महिन्यात टोलनाके बंद ठेवणं आणि जुन्या नोटांचा महत्त्वाच्या सेवांसाठी स्वीकार या तारखांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली. टोलनाके सुरू झाल्यानंतर तिथं जुन्या नोटांच्या स्वीकाराबाबतचं धोरणही सातत्यानं बदलत राहिलं. आता पंतप्रधानांनी सांगितलेले 50 दिवस संपत आले असताना अद्यापही सुट्ट्या पैशांचा तुटवडा संपलेला नाही. पुरेशा तयारीआभावी केलेल्या नोटाबंदीमुळे सरकारला 42 दिवसांमध्ये तब्बल 52 घोषणा करण्याची वेळ आलीये...