आमदार दानवेंच्या पीएकडून दोन महिलांचा विनयभंग

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या सचिन जाधव या स्वीय सहाय्यकाने मद्यधुंद अवस्थेत रविवारी रात्री देवगिरी एक्सप्रेसमध्ये दोन वरिष्ठ सरकारी महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग केला.  मात्र राजकीय दबावामुळे या महिला अधिकाऱ्यांची तक्रार दाखल करुन  घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषदेत केला. 

Updated: Aug 4, 2016, 05:47 PM IST
आमदार दानवेंच्या पीएकडून दोन महिलांचा विनयभंग    title=

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या सचिन जाधव या स्वीय सहाय्यकाने मद्यधुंद अवस्थेत रविवारी रात्री देवगिरी एक्सप्रेसमध्ये दोन वरिष्ठ सरकारी महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग केला.  मात्र राजकीय दबावामुळे या महिला अधिकाऱ्यांची तक्रार दाखल करुन  घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषदेत केला. 

राणे यांनी हे प्रकरण पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून  विधानसभेत मांडले मात्र त्यावर गदारोळ झाल्यानंतर त्यामधील नावे वगळण्याचा आदेश विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिला. हे प्रकरण अत्यंत निंदनीय असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्षांनी  सरकारला दिले. 

या प्रकरणातील आरोपी हा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या आमदार असलेल्या मुलाचा पीए असल्याने या प्रकरणी योग्य चौकशी होण्यासाठी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राणे यांनी दिली.   या दोन्ही महिला वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत, एक महिला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ पदावर आहे. मात्र दानवे यांच्या राजकीय दबावामुळे आरोपी सचिन जाधव यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही. इगतपुरी स्थानकावर त्यांनी या प्रकरणी महिला हेल्प लाईनवर तक्रार नोंदवली होती मात्र हेल्पलाईनवर केलेली तक्रार गायब करण्यात आली आहे.  

या घटनेचे अनेक आमदार साक्षीदार आहेत, मात्र आता राजकीय दबाव आणून या महिलांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसोबत असे वर्तन होत असेल तर सामान्य महिलेला काय न्याय मिळेल, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.