मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीत अवघ्या दीड तासात तब्बल दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळून या करोडो रूपयांच्या कामांना मंजुरी दिली.
अवघ्या ९० मिनिटांत ९७ कामांचे प्रस्ताव संमत करण्यात आले. बैठकीच्या अजेंड्यावर सकाळीच आणलेले ३४ प्रस्ताव तर कोणतीही चर्चा न करताच पास करण्यात आले. ऐनवेळी आणलेल्या प्रस्तावांना इतर वेळी विरोधक आडकाठी आणतात. अभ्यासासाठी वेळ हवा, असं कारण सांगून प्रस्ताव अडकवून ठेवतात. पण बुधवारी मात्र विरोधकांचा आवाज बंद होता. याआधीच्या स्थायी समितीच्या बैठकीत ४६ मिनिटांत ११०० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. निवडणुकीच्या तोंडावर विविध कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा धडाकाच नगरसेवकांनी लावला आहे.