स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर

 राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: Feb 26, 2017, 06:01 PM IST
स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर title=

मुंबई : राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

महापालिकेसह जिल्हा परिषदांमध्येही भाजप हाच नंबर वन पक्ष ठरलाय. राज्याच्या ग्रामीण भागात कधी नव्हे एवढी भाजपची कमळं यंदा फुललीत. गेल्यावेळी चौथ्या क्रमांकावर असलेला भाजप 406 जागा जिंकून अव्वल आला. तर गेल्यावेळी नंबर वन असलेली राष्ट्रवादी काँग्रेस 360 जागांसह दुस-या क्रमांकावर घसरली. गेल्यावेळी दुस-या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं 309 जागा जिंकल्या, पण त्यांचा तिसरा नंबर आला. तर गेल्यावेळी तिस-या क्रमांकावर असलेली शिवसेना 261 जागा जिंकून चौथ्या क्रमांकावर फेकली गेली.

जिल्हा परिषद निवडणुकांआधी स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर आलेत. निवडणुकीआधी बेटकुळ्या फुगवून स्वतंत्रपणे लढणारे आता सत्तेसाठी युती आणि आघाडीची गणितं मांडू लागलेत. तर सत्तेचा हा खेळ रंगला आहे.

भाजपनं 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत चार जिल्हा परिषदा स्वबळावर काबीज केल्या. चंद्रपूर, वर्धा, लातूर आणि जळगावमध्ये भाजपनं एकहाती बहुमत मिळवलंय. पुणे आणि साता-याचा गड राष्ट्रवादीनं यंदाही कायम राखलाय. सिंधुदुर्गात नारायण राणेंनी काँग्रेसला तारलं. तर रत्नागिरीत शिवसेनेनं आपला वरचष्मा कायम टिकवला.

मात्र या 8 जिल्हा परिषदांचा अपवाद वगळता तर बाकीच्या ठिकाणी सत्तेसाठी युती किंवा आघाडीचा खेळ रंगणार आहे. मतदारांनी कुणाही एका पक्षाच्या पारड्यात कौल न टाकल्यानं, सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी दिल आणि दोस्ती दोबारा जुळवण्याची वेळ राजकीय पक्षांवर आलीय. निवडणुकीआधी महाभारत रंगवणा-या कौरव-पांडवांना सत्तेचं हस्तिनापूर जिंकण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे.

भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास नाशिक, सांगली, जालना, हिंगोली, औरंगाबाद, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हा परिषदेत सत्ता येऊ शकते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा हातमिळवणी झाल्यास अहमदनगर, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती आणि गडचिरोली सत्ता मिळू शकते.

ज्यांच्या जागा जास्त त्यांचा अध्यक्ष आणि मित्रपक्षाला उपाध्यक्षपद असा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. त्यादृष्टीनं काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्यात. तर भाजप-शिवसेनेची मनं जुळणार का, हे प्रामुख्यानं मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणावर अवलंबून असणार आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशी ही युतीची कहाणी नजीकच्या भविष्यात काय वळण घेते, यावर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून आहे.