मुंबई: बिहारमध्ये भाजपच्या पराभवाचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून चांगलाच समाचार घेतलाय. लोकभावना उद्याचा जनदेश आहे. आमचे पाय जमिनीवर आहे, ज्यांचे नव्हते ते आपटले.. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आलीय.
आणखी वाचा - बिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट
राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमपेक्षाही बिहारमध्ये शिवसेनेला मताधिक्य जास्त आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आता कधीही निवडणूका घ्या, त्यात शिवसेना स्वबळावर विजयाची गरुडझेप घेईल असाही टोला मारण्यात आला आहे.
बिहारमध्ये 'बहार' पाहुयात सामनामध्ये काय म्हटलं...
"लोकसभा निवडणुकांच्या विजयानंतर फक्त दीड वर्षात झालेली ही पडझड आहे. या पडझडीची जबाबदारी आता कोण घेणार? बिहारात भाजपचा पराभव झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील असे शेवटी शेवटी अमित शहांनी सांगितले. पाकिस्तानचे माहीत नाही, पण ‘बिहारा’त नितीश विजयाचे फटाके वाजले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे शेवटी त्यांनाच शोधायची आहेत. भारतीय जनता पक्षाचे काय चुकले यावर आम्ही पामर काय भाष्य करणार? विनम्रता हा सत्ताधीशांचा फक्त अलंकार नसतो तर संरक्षणाचे हत्यार असते. बिहारच्या निकालाने दिलेला हा संदेश आहे. लालू यादव यांच्यावर ‘जंगल राज’ आणि ‘भ्रष्टाचारा’चे आरोप करूनही बिहारात त्यांचा पक्ष पहिल्या क्रमांकाचा ठरला. काँग्रेसच्या युवराज राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवूनही त्यांना बिहारात उत्तम जागा मिळाल्या. आता काँग्रेसला सत्तेत वाटा मिळेल. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून बिहारात ३०च्या वर प्रचंड सभा घेतल्या. त्या सभांचे फलित म्हणायचे तर ५५ जागासुद्धा नाहीत. शिवसेना बिहारात एका जिद्दीने लढली. राष्ट्रवादी काँग्रेस, ‘ओवेसी’च्या एमआयएमपेक्षा शिवसेनेचे मताधिक्य जास्त आहे हा एक प्रकारे विजयच आहे. मोठ्या प्रमाणावर ‘साधनसंपत्ती’ पणास लावूनही बिहारात भाजपचा पराभव झाला."
आणखी वाचा - महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.