मुंबई : गरीब घरातला १२ वर्षांचा जुनैद... कदाचित यापुढे तो त्याच्या एका डोळ्याने पाहू शकणार नाही. त्याने रडण्याचा प्रयत्न केला तरी तो रडू शकणार नाही. पण, हे सर्व ऐकून मात्र त्याच्या पालकांना आता रडू आवरत नाही. त्यात आपल्या एका लहानशा चुकीमुळे त्याची दृष्टी जाणार म्हणून जुनैदची आई सध्या सर्वात जास्त अस्वस्थ आहे.
डोळ्यांसाठी घातक चुना...
नालासोपाऱ्यात राहण्यारा जुनैद घरात खेळत असताना त्याच्या आईचा पाय चुन्याच्या ट्यूबवर पडला. त्यातील काही चुना चटकन् जुनैदच्या डाव्या डोळ्यात गेला. डोळा धुतल्यानंतरही अंधूक दिसत असल्याने तो परिसरातील डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी डोळ्यात घालायला औषध दिले तरी १० दिवसांनंतरही डोळा बरा झाला नाही. शेवटी जुनैदला केईएम हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं.
अश्रू झाले बंद
त्याची दृष्टी अंधूक होत होत चालली आहे, याची डॉक्टरांना शंका आली. तरी डॉक्टरांनी प्रयत्न करुन त्याची ५० टक्के दृष्टी वाचवली आहे. चुन्यातील अल्कली हा घटक डोळ्यात जाऊन डोळ्यातील कॉर्नियावर त्याचा परिणाम झाल्याचे डॉक्टरांचे मत आहे. डोळ्याचे रक्षण करणाऱ्या प्लॅटिनो ग्रंथींवर इजा झाल्याने आता त्याचा डोळा कोरडा पडला आहे. यापुढे त्याच्या डोळ्यांतून अश्रू येणेही बंद होणार आहे.
एक डोळा कायमचा निकामी होणार?
डोळा कोरडा पडल्याने आता त्याचे प्रत्यारोपण करणेही शक्य होणार नाही. कोरड्या डोळ्यात कॉर्नियाचे प्रत्यारोपण करता येत नाही. उशीरा उपचार मिळाल्याने जुनैदचा एक डोळा कायमचा निकामा होण्याची शक्यता आहे.
हलाखीची आर्थिक परिस्थिती
जुनैदच्या कुटुंबाची परिस्थिती फारच गरीबीची. त्याची आई चुन्याच्या ट्यूबला झाकण लावण्याचे काम करते. तीनशे ट्यूबला झाकण लावल्यावर त्याच्या आईला केवळ १५ रुपये मिळतात. आता, मात्र या मातेची हे काम करण्याची हिंमत राहिली नाही. तिने ते कामही बंद केलंय. या माऊलीला आपल्या मुलाच्या डोळ्यांत पाणी दिसत नसलं तरी तिच्या डोळ्यांची धार काही केल्यानं थांबायचं नाव घेत नाहीय.