मुंबई : सनातनने कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा जबरदस्ती केली नसून आम्ही आमच्या मर्जीने सनातन आश्रमात आलो असल्याचे स्पष्टीकरण उत्तरप्रदेशातील सनातन साधक प्रिती आणि प्रिया या दोन्ही बहिरणींनी दिलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या भदोईच्या चौरसिया परिवारातील प्रीती आणि प्रिया यांना संमोहित करून, सनातनच्या आश्रमात डांबून ठेवले आहे असा आरोप चौरसिया कुटुंबियांनी केला आहे. मात्र त्याला आज प्रिती आणि प्रिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे.
अधिक वाचा : मानवी बाँबच्या आरोपावरून सनातनचा श्याम मानवांवर घणाघाती आरोप
सनातन संस्थेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, चौरसिया कुटुंब आणि प्रसार माध्यामांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अनेक पत्रकार आणि सनातनच्या साधकांमध्ये शाब्दिक चकमकीही उडाल्या. यावेळी सनातनच्या साधक स्वाती, प्रिती आणि प्रिया उपस्थित होत्या.
कोणताही दबाव नाही, स्वतःच्या मर्जीने आश्रमात .
आश्रमात येण्यासाठी आम्हांला कोणीही जोरजबरदस्ती केली नाही, आम्ही स्वःमर्जीने आश्रमात आलो आहे, असे उत्तरप्रदेशातील या भगिनींनी सांगितले. आम्ही सनातन संस्थेत साधक म्हणून आल्याने आमचे कुटुंबिय आमच्याविरोधात नको ते आरोप करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमचा भाऊ आम्हांला खालच्या स्तराला जाऊन दुषणं देत आहे, पण तो ज्या पैशाची भाषा करतो आहे तो पैसा आम्हीच त्याला दिला आहे. तो त्या पैशावर मौजमजा करीत आहे.
श्याम मानव यांच्यावर टीकेची झोड
श्याम मानव हे सनातनला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील तरूणींचे नाव घेऊन सनातनला आणि तरूणींना बदनाम केले आहे, अशी टीका सनातनच्या आणखी एक साधक स्वाती यांनी केला. त्यांचं वय झाल्यामुळे ते काहीही बडबडत आहेत. मात्र माध्यमांनी त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य मानत, टीआरपीसाठी खोटी प्रसिद्धी देत आहेत, असं स्वाती म्हणाली.
अधिक वाचा : श्याम मानव यांना सनातनचे आव्हान, तुम्ही हे करु दाखवाच!
सनातनवरील टीकेमुळे आमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. माझी मुलगी आहे, मी पण कोणाची मुलगी आहे. श्याम मानव आणि माध्यमांमधील आरोपामुळे आम्ही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलो नाही, असंही सनातनच्या साधकांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.