www.24taascom, मुंबई
सत्तरच्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गारवणारे पहिले सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांच्यावर त्यांचा नातू आरवने गुरुवारी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. सुपस्टारच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर लोटला होता. रस्त्या दोन्ही बाजुला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळी बांद्र्यातील आशीर्वाद बंगल्यापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या गाडीत राजेश खन्ना यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी गाडीमध्ये त्यांची पत्नी डिंपल, मुलगी रिंकी, जावई अक्षय कुमार, नातू आरव हे होते. बांद्रा येथील कार्टर रोड ते विलेपार्ले स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक चाहते अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. अनेक चाहत्यांनी पुष्पवृष्टी करून काकांचे अंत्यदर्शन घेत होते.
विलेपार्ले स्मशानभूमीजवळ अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. खन्ना कुटुंबियांच्या सांगण्यानुसार स्मशानभूमीत कोणालाही आत सोडण्यात आले नाही. केवळ परिवारातील आणि बॉलिवूडमधील कलाकारांनाच स्मशानभूमीत सोडण्यात आले. राजेश खन्नां याचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते.