`आधुनिक एकच प्याला`

नांदीचे सूर कानी आले की पडदा वर जाणार आणि एक झक्कास नाटक पहायला मिळणार हे ओघानंच आलं.....

Updated: Jan 26, 2013, 08:49 PM IST

www.24taas.com, मुंबई
नांदीचे सूर कानी आले की पडदा वर जाणार आणि एक झक्कास नाटक पहायला मिळणार हे ओघानंच आलं..... ‘झी 24 तास’च्या तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं एका नाट्याचा पडदा आम्ही आज वर करतोय. किंबहुना आम्हांला हे नाटक सादर करायला लागतंय.... आधुनिक एकच प्याला..... गेले कित्येक दिवस नाट्यक्षेत्रातल्या आघाडीच्या कलाकारांमध्ये हे नाट्य गाजतंय... निमित्त आहे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीचं... त्याचे अध्यक्ष कोण होणार उत्स्फूर्त पॅनलचे मोहन जोशी की नटराज पॅनलचे विनय आपटे......
या सगळ्या नाट्याचे विविध अंक गेले काही दिवस पहायला मिळतायत. आता या नाटकाचा नवा खळबळजनक अंक आज ‘झी 24 तास’ तुमच्या समोर आणणार आहे... हा अप्रकाशित अंक सगळ्यात आधी फक्त ‘झी 24 तास’ तुमच्यासमोर आणतंय.. नाशिकमधल्या चांदवडमध्ये मोहन जोशींच्या नाटकाचा प्रयोग होता. तिथं जाऊन या साहेबांनी जो काय धिंगाणा घातला, तो धिंगाणा एका आमदारानं याचि देही याचि डोळा पाहिला आणि त्यानं तो कथन केला..... चांदवडमधल्या यशोधन लॉजमध्ये या महाशयांनी काय प्यायलं कुणास ठाऊक आणि ते असे काही सुटले की अर्वाच्च भाषेत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांनाच शिव्या घालायला सुरुवात केली. नक्की कसा रंगला हा एकच प्यालाचा हे देखील आमदारसाहेबांनी कथन केलं आहे. दारू पिऊन धिंगाणा लॉजवर घातल्याचेही आमदारसाहेबांनी सांगितले आहे.
मोहन जोशींची थिल्लरगिरी इथेच थांबली नाही तर चांदवडमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते गेले, तिथे त्यांनी ही यड्यांची जत्रा सुरूच ठेवली. मोहन जोशींनी निसर्ग लॉजवरही असाच धिंगाणा घातला..... चांदवड गावातली मुलं या अभिनेत्याला त्याच्या लॉजवर सोडायला गेली तिथेही लॉजवरच्या रुमचं दार उघडेपर्यंतही त्यांना धीर नव्हता. त्यांनी दारावर जोरदार लाथाबुक्के मारायला सुरुवात केली.

मोहन जोशींचा असा धिंगाणा घालणं अजिबात नवं नाही.... याआधीही याच पुरुषानं दारु पिऊन अनेकवेळा नाटकांचे प्रयोग रद्द केलेत. नाटकात आसू आणि हसू पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना यांनी नाथा पुरे आता म्हणायला लावलं. तुमचं नाटक पहायला तिकीटं काढून लोक येतात, त्या नाटकाचा सुखान्त पाहण्याची त्यांची इच्छा असते. पण मोहन जोशींची ही बेतालगिरी प्रेक्षकांच्या उत्साहाचा पुरता सत्यानाश करते म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की दारु पिऊन धिंगाणा घालणा-या आणि नाटकांचे प्रयोग केवळ त्यामुळे रद्द करणा-या या माणसानं नाट्यपरिषदेचा अध्यक्ष व्हावं का.....
मराठी प्रेक्षक सुज्ञ आहेत.... निर्णय त्यांनीच घ्यायचाय...... कुणाचंही चारित्र्यहनन करण्याचा आमचा हेतू नाही..... उलट मराठी रंगभूमीच्या प्रेमापोटी दर आठवड्याला अर्ध्या तासाचा नाट्य दरबार सादर करणारी ‘झी 24 तास’ ही एकमेव वृत्तवाहिनी आहे. आणि त्याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. आम्ही या कार्यक्रमातून नव्या प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांचा वेध घेतोच पण नाट्य व्यवसायातल्या उणिवांवर, दोषांवरही आम्ही बोट ठेवतो. मराठी रंगभूमीची ही चळवळ आणखी जास्त उत्साहाने सुरू रहावी, यासाठीच आम्ही हे सगळं करतोय. एकंदरीत नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या गाढवाच्या लग्नाचा हा प्रयोग गाजणार एवढं नक्की......