पुण्यात जर्मन बेकरी पुन्हा सुरू होणार?

पुण्यावर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे जर्मन बेकरीत झालेले बॉम्बस्फोट. या घटनेला तीन वर्ष झाली. स्फोटात उध्वस्त झालेली बेकरी पुन्हा सुरु करण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. बेकरी कधी सुरु होणार, याची पुणेकरांना देखील तेवढीच प्रतीक्षा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2013, 09:06 PM IST

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
पुण्यावर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे जर्मन बेकरीत झालेले बॉम्बस्फोट. या घटनेला तीन वर्ष झाली. स्फोटात उध्वस्त झालेली बेकरी पुन्हा सुरु करण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. बेकरी कधी सुरु होणार, याची पुणेकरांना देखील तेवढीच प्रतीक्षा आहे. मात्र, काम पूर्ण होत आलेली बेकरी सुरु होणार का… याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला माहित झालेली ही जर्मन बेकरी… हल्ल्यानंतर पुन्हा सावरुन नव्या रुपात पुन्हा ग्राहकांसमोर येण्यास जर्मन बेकरी सध्या सज्ज झाली आहे. मात्र, ती कधी सुरु होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. कारण आहे. बेकरी नव्याने उभारताना करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम आणि सुरक्षा व्यवस्था. स्फोटानंतर जर्मन बेकरीच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडीट करणं गरजेचं होतं. पण ते करण्यात आलंच नाही. त्यात बेकरीचा स्लॅब फोडून नवीन जिना करण्यात आलाय. त्यामुळे संपूर्ण इमारतीलाच धोका पोहचू शकतो. बेकरीच्या इमारतीच्या आत हे प्रकार सुरु असताना, बेकरीची कंपाऊंड वॉल तब्बल आठ फूट उंच करण्यात आलीय. त्यालाही महापालिकेनं नोटीस बजावलीय. विशेष म्हणजे जर्मन बेकरीचे चालकसुद्धा काही त्रुटी राहिल्याचं मान्य करत आहेत.
अनधिकृत बांधकामाच्या मुद्दाकडे एकवेळ दुर्लक्ष करता येऊ शकतो...पण सुरक्षेचं काय? सुरक्षेच्या बाबतीत तडजोड शक्यच नाही...बेकरीची आठ फूट उंच कंपाऊंड वॉल, एन्ट्री आणि एक्झिटसाठी एकच दार आणि भविष्यात सुरु करण्यात येणारा बार, अशा सगळ्या गोष्टींमुळे जर्मन बेकरी पुन्हा एकदा टार्गेट करणं दहशतवाद्यांना सहज शक्य आहे अशी भीती तज्ञ व्यक्त करतायत...

त्यातच जर्मन बेकरीच्या जागेवरून मूळ मालक असलेल्या खरोसे कुटुंबियांमध्ये न्यायालयीन वाद सुरु आहे. त्यामध्ये न्यायालयाने जर्मन बेकरी विकण्यास किंवा त्रयस्थ व्यक्तीला चालवायला देण्यास मनाई केली आहे. असं असतानाही बेकरी विजय शेवाळे यांना देण्यात आलीय. आणि बेकरीच्या नूतनीकरणाचा सर्व खर्च आपणच केल्याचं शेवाळे सांगतायेत. त्यामुळे बेकरी पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने स्मिता खरोसे यांना दिलेल्या १४ लाखांचं काय झालं… हा प्रश्न देखील विचारला जातोय...