प्रताप नाईक, www.24taas.com, कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहु महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतीक क्रांतीचे अग्रदुत म्हणुन मान्यता पावलेले थोर राजे. पण अशा या थोर राजाचे जन्मठिकाण असणा-या कोल्हापूरातील लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभिकरणाचं काम निधी उपलब्ध असूनही संथ गतीनं सुरु आहे. त्यामुळं शाहु प्रेमीतुन संताप व्यक्त होतोय.
छत्रपती शाहु महाराजांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारनं 18 डिसेंबरला तात्काळ शाहु मिलमध्ये शाहुचं स्मारक उभारण्याला तत्वत: मान्यता दिली. पण दुसरीकडं कोल्हापुरातील कसबा बावडा परीसरातील शाहू जन्मस्थळाच्या विकासाचे काम अतिशय संथ गतीनं सुरु आहे. राज्य सरकारनं शाहु जन्मस्थळाच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलाय. पण वास्तुविशारद अमरजा निंबाळकर आणि ठेकेदार ओसवाल यांच्यातील अंतर्गत वादामुळं विकासाचे काम मंद गतीनं सुरु आहे. हे काम करण्यास अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. पण पंधरा महिने उलटले तरी पन्नास टक्केही काम अद्याप झालेलं नाही. तसंच यातील पाच कोटींचा निधी वापरला नसल्यामुळं परत जाण्याच्या मार्गावर आहे.
शाहु जन्म स्थळामध्ये शाहुकालीन इमारतीचं नुतनीकरण करण्याबरोबरच शाहु महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारं संग्रहालयही उभारण्यात येणार आहे. साडेचार एकरमध्ये सुरु असलेलं काम कासवगतीनं सुरु आहे. त्यामुळं कोल्हापूरातील शाहु प्रेमी संताप व्यक्त करत आहेत.
देशाला समतेचा संदेश देणा-या शाहु महाराजांचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीनं शाहु प्रेमी प्रयत्न करतायत. पण दुसरीकडं मात्र त्याच्यांच जन्म ठिकाणाच्या सुशोभिकरणासाठी आलेला निधी परत जातोय या सारखं दुर्देव तरी काय.